दोन वर्षांनंतर संशयिताविरोधात गुन्हा नोंद : १६ लाखांचीही लूट

मडगाव : येथील रेल्वेस्थानक परिसरात २०२४ मध्ये महिलेला गुंगीचे औषध पाजून बलात्कार करण्यात आला. याशिवाय तिच्याकडील १६ लाख लुटण्यात आले. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित पप्पूजी तिवारी याच्याविरोधात गुन्हा नोंद केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
महिलेवर अत्याचार व लुटीची ही घटना दोन वर्षांपूर्वी १५ जून २०२४ रोजी मडगाव रेल्वेस्थानकाच्या सहा क्रमांकाच्या गेटनजीक घडली होती. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित पप्पूजी तिवारी उर्फ देव पंडित उर्फ अजय तिवारी (रा. बलरामपूर, उत्तरप्रदेश) याने तिला गुंगीचे पेय पाजले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर संशयित तिवारी याने पीडित महिलेकडील १६ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन पळ काढला होता. दोन वर्षांनंतर आता या घटनेची प्राथमिक तक्रार पीडितेने उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे नोंदवली होती. गुन्हा घडलेले ठिकाण मडगाव असल्याने बलरामपूर पोलिसांनी हे प्रकरण मडगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
मडगाव पोलिसांनी संशयिताविरुद्ध नशा देऊन लैंगिक अत्याचार करणे, फसवणूक करणे, विश्वासघात करणे, धमकावणे व खंडणी या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मडगाव पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनुष्का परब या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.