
पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यात २५ जागांवर भरती केली जाणार आहे. यातील ९ जागा ट्रान्स्फर ऑन डेप्यूटेशनची आहेत. या जागांसाठी आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जूनपर्यंत आहे. तर अन्य १४ जागेसाठी अंतिम मुदत २२ मेपर्यंत आहे. यामध्ये ३ जागा बातम्या बीडीओ, ४ जागा मानसोपचारतज्ज्ञ, उप नगर नियोजकाच्या २ , क्लिनिकल मानसशास्त्रज्ञांच्या २ जागांचा समावेश आहे.
कार्मिक खात्यात ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकाऱ्यांच्या ३ जागांसाठी वयोमर्यादा ४५ आहे. यातील १ जागा आरक्षित असेल. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, कोकणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उप नगर नियोजकाच्या पदासाठी या विषयातील पदवी, २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. आरोग्य खात्यात दंत महाविद्यालयात लेक्चररच्या ५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदव्युत्तर पदवी, दंत परिषदेकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. आयपीएचबीमध्ये ४ मानसोपचारतज्ज्ञाच्या जागेसाठी वैद्यकीय पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
याशिवाय या जागांसाठी २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञांच्या २ जागांसाठी पदव्युत्तर पदवी, किमान दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. पर्यावरण खात्यात शास्त्रीय अधिकारी, सहाय्यक संचालक या पदांच्या प्रत्येकी २, सहाय्यक अभियंत्याच्या ३,पर्यावरण अधिकारी आणि सहायक संचालक (तांत्रिक) या पदाची प्रत्येकी एक जागा ट्रान्स्फर ऑन डेप्यूटेशनद्वारे भरण्यात येणार आहेत.
सर्व पदांसाठी अर्जाचे शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरल्यावर अर्ज गृहीत धरण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून पुढील भरती प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. अपवाद वगळता सर्व पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.