गव्यांमुळे दीड वर्षात दोघांनी गमावला जीव

वन खात्याने गव्यांचा बंदोबस्त करण्याची बेतोडा परिसरातून मागणी​

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 08:19 pm
गव्यांमुळे दीड वर्षात दोघांनी गमावला जीव

फोंडा : बेतोडा येथे मंगळवारी रात्री गव्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ साली एका महिलेवर हल्ला करून गव्याने बळी घेतला होता. अवघ्या दीड वर्षात गव्यांनी दोघांचा बळी घेतला असून वन खात्याच्या कारभारावर शंका व्यक्त करण्यात येत आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.

बेतोडा भागात गव्यांचा संचार वाढल्याने सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. भर दिवसात गवे लोकवस्तीत दिसून येत आहेत. बोणबाग, पाडल, दुर्गाभाट, ढवळी, कुर्टी, मेस्तवाडा- बेतोडा व अन्य भागात गव्यांचा संचार वाढलेला आहे. गव्याच्या हल्ल्यात आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे. आणखीन हल्ले होऊ नये म्हणून वन खात्याच्या अधिकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी लोक करीत आहेत.

बेतोडा ते कुर्टीपर्यंतच्या बगल रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांच्या भोवती संरक्षक भिंती उभारल्याने जनावरांना पाणी मिळत नाही. जनावरे पूर्वी नाल्यात पाणी पिऊन तहान भागवत होते. परंतु, संरक्षक भिंत उभारल्यामुळे जनावरांना लोकवस्तीत प्रवेश करून पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना बांधकाम खात्याने जनावरांसाठी नाल्यात जाण्यासाठी खास रस्ता तयार केला नसल्यामुळे जनावरांचा संचार लोकवस्तीत दिसून येत आहे.

गव्यांचा संचार लोकवस्तीत वाढलेला आहे. गव्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन लोकांचा बळी गेला असून भविष्यात असे प्रसंग रोखण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. वन अधिकाऱ्यांनी लोकवस्तीत येणाऱ्या जनावरांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात आणखीन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे मंगलदास गावडे यांनी सांगितले.

सर्वेश प्रभूवेळेगेकर यांनी रस्त्याचे रुंदीकरण जंगलातील जनावरांसाठी घातक ठरत असल्याचे सांगितले. यामुळे जनावरे भरलोकवस्तीत पाण्यासाठी येत आहेत. नाल्यात पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या जनावरांसाठी रस्ता मोकळा ठेवण्याची गरज होती. सध्या दोन दुर्घटना घडल्या असून पुढील धोका टाळण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न गरजेचे असल्याचे प्रभूवेळेगेकर यांनी सांगितले.

हेही वाचा