जीएमसीत आणखी ७ ओपीडी सेवांसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू

दरोरोज ५० स्लॉट्स उपलब्ध : सोमवारपासून सुविधेचा लाभ घेता येणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 11:55 pm
जीएमसीत आणखी ७ ओपीडी सेवांसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयातील ओपीडी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी प्रशासनाने आणखी ७ विभागांसाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून (११ मे) ही सेवा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध होईल.
नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या विभागांमध्ये एंडोक्राइनोलॉजी पेडियाट्रिक्स, प्लास्टिक सर्जरी, न्यूरोसर्जरी, कार्डिओव्हस्कुलर थोरेसिक सर्जरी, जेरियाट्रिक मेडिसिन, पेडियाट्रिक सर्जरी आणि नेफ्रोलॉजी या ओपीडींचा समावेश आहे.
प्रत्येक ओपीडीसाठी दिवसाला ५० जणांना ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळू शकणार आहे. इच्छुक रुग्ण https://www.gmcgoa.edu.in या संकेतस्थळावर जाऊन आपले बुकिंग करू शकतात. पुढील ७ दिवसांसाठी आगाऊ बुकिंग करण्याची सोय असेल. संबंधित दिवसाच्या अपॉइंटमेंटसाठी आदल्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच बुकिंग करता येईल. ५ वाजेनंतर त्या दिवसाचे पोर्टल बंद होईल. ऑनलाईन सुविधा सुरू झाली असली तरी, रुग्णालयात प्रत्यक्ष रांगेत उभे राहून ऑफलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेण्याची जुनी पद्धतही सुरूच राहणार आहे. अपॉइंटमेंट कशी बुक करावी, याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही यासंदर्भात अधिक माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जीएमसीमध्ये फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा ओपीडीसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा सुरू झाली होती. त्यावेळी ऑर्थोपेडिक, जनरल सर्जरी, ईएनटी, मेडिसिन आणि डर्मेटोलॉजी या विभागांचा समावेश होता. आता त्यात आणखी ७ विभागांची भर पडल्याने रुग्णांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा