घटनेवेळी हजर नसल्याचा बचाव फसला; बेकायदा शस्त्र बाळगणे न्यायालयाने मानले गंभीर

मडगाव: केपे येथील कावरे-पिर्ला येथे संशयित श्वेत गावडे याच्याकडून बंदूक हाताळताना तन्वी घाडी (२०) या तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात वापरलेले बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित श्याम गावकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम एस. प्रभू देसाई यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी कावरे-पिर्ला येथे घडली होती. डिचोली येथील रहिवासी श्वेत गावडे (२३) हा संशयित श्याम गावकर याच्या मालकीची बंदूक हाताळत असताना अचानक गोळी सुटली. ही गोळी तन्वी घाडी हिच्या मानेला लागली, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
सुनावणीदरम्यान, शाम गावकर घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. मात्र, विनापरवाना शस्त्र बाळगणे आणि त्याचा गंभीर गुन्ह्यात वापर होणे ही बाब न्यायालयाने अत्यंत गंभीर मानली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास अद्याप प्राथमिक टप्प्यावर असून, संशयिताला जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची किंवा तपासात अडथळा येण्याची शक्यता न्यायालयाने वर्तवली. बेकायदा शस्त्राचा स्रोत काय होता आणि ते मुख्य संशयित श्वेत याच्या हातात कसे आले, याचा छडा लावण्यासाठी श्याम गावकर याची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.