म्हापसा बाजारपेठेतील गणेश बेकरीला आग; ८० हजारांचे नुकसान

शुक्रवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत गर्दी; आग वेळीच विझवल्याने मोठे संकट टळले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
म्हापसा बाजारपेठेतील गणेश बेकरीला आग; ८० हजारांचे नुकसान

म्हापसा: येथील बाजारपेठेतील 'चण्याची खोरणा' गल्लीतील 'गणेश बेकरी' या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत इलेक्ट्रिक ओव्हन आणि त्यातील बिस्किटे जळून खाक झाल्याने सुमारे ८० हजारांचे नुकसान झाले आहे. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.



ही घटना शुक्रवारी सकाळी ६:१५ च्या सुमारास घडली. म्हापसा मार्केटमधील 'चण्याची खोरणा' गल्लीच्या समोर बसलेल्या विक्रेत्यांना विक्रांत टक्केकर यांच्या गणेश बेकरी दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रकाश कान्नाईक यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बंद दुकानाचे कुलूप कापून शटर उघडले असता संपूर्ण दुकान धुराने भरले होते.



दुकानातील अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून जवानांनी पाण्याचा फवारा मारण्याऐवजी 'सीओटू' (CO2) फोमचा वापर करून आग विझवली. त्यानंतर जवानांनी ओव्हन बाहेर काढला, मात्र आतील बिस्किटांनी पेट घेतल्याने सर्व साठा जळून खराब झाला.



घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस हवालदार तुषार रेडकर आणि हवालदार रूपेश कोरगावकर यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दुकान मालक टक्केकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नजरचुकीने दुकानातील वीज पुरवठा बंद करायचा राहिला होता, यामुळे हे शॉर्ट सर्किट झाले. शुक्रवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत विक्रेत्यांची मोठी गर्दी होती. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा