प्रत्येक पक्षाच्या कार्याचा विचार करून जनतेने निर्णय घ्यावा

पणजी : राज्यात मगोने पहिली १७ वर्षे राज्य केले आहे. नंतर काँग्रेसची राजवट होती आणि आता भाजपखाली युती सरकार आहे. कुणी चांगले काम केले त्याचा विचार करून जनतेने योग्य तो निर्णय घ्यायला हवा. येत्या निवडणुकीत मगो-भाजप युतीला किमान २५ जागा मिळणार. युती झाली तरच एवढ्या जागा मिळणे शक्य आहे, असे वीजमंत्री तसेच मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.
कोण कसे काम करतो, ते पाहून जनतेने विचार करून निर्णय घ्यायला हवा. याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही. मी चांगले काम केले म्हणून आज मंत्री आहे, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. भाजप-मगो युतीत मगो किती जागा मागणार, याचा निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेणार, असे त्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीची १५ वर्षे राजवट होती. सरकारविरोधात असलेल्या अॅन्टी इन्कबंसीचा फटका टीएमसीला बसला. मागील निवडणुकीत मगोने टीएमसीकडे युती केली होती. मगोने टीएमसीसोबत केलेल्या युतीचे कारण वेगळे होते, असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत १ लाख स्मार्ट मीटर बसवले
केंद्राच्या आदेशामुळे राज्यात स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक आहे. आतापर्यंत १ लाखावर स्मार्ट मीटर बसवून झाले. दिलेल्या मुदतीत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम पूर्ण होणार. चांगल्या कामाला नेहमीच विरोध असतोच. स्मार्ट मीटरलाही विरोध होत आहे. स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ही दोन्ही बील भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
भाजपला स्वबळावर ३० जागा जिंकण्याचा विश्वास
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व ४० मतदारसंघांत मोर्चेबांधणी सुरू केली असून, स्वबळावर किमान ३० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला. ‘मगो’ पक्षासोबतच्या युतीबाबत बोलताना नाईक म्हणाले की, सध्या युती असली तरी आगामी निवडणुकीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. युती झाल्यास जागांची संख्या नक्कीच वाढेल, मात्र युती न झाल्यासही भाजप स्वबळावर पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या विधानाशीही त्यांनी काही प्रमाणात सहमती दर्शवली.