ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचा उपक्रम; सहा अनुभवी प्रशिक्षक-डेव्हलपर्स गोव्यात दाखल

मडगाव : भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी आणि स्थानिक प्रशिक्षकांना जागतिक स्तरावरील तंत्रांची ओळख करून देण्यासाठी ‘ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन’ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इंग्लंडमधील नामांकित ‘प्रीमियर लीग’च्या सहकार्याने सहा अनुभवी प्रशिक्षक-डेव्हलपर्स सध्या गोव्यात दाखल झाले असून, ते भारतीय प्रशिक्षकांना विशेष मार्गदर्शन करत आहेत.
दक्षिण गोव्यात सध्या ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धा-अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) कनिष्ठ लीग सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय क्लबच्या प्रशिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रीमियर लीग प्रशिक्षक-डेव्हलपर्सच्या या पथकाचे नेतृत्व कार्ल प्लंकेट करत आहेत. त्यांच्या ताफ्यात जागतिक फुटबॉलमधील मातब्बर क्लबच्या प्रतिनिधींचा समावेश आहे:
यामध्ये ख्रिस फोरमन (ॲस्टन व्हिला एफसी), कॉलिन लिटलजॉन्स (एव्हर्टन एफसी), जॉन स्कॉट (एएफसी बॉर्नमाउथ), मॅक्स चॅपमन (वेस्ट हॅम युनायटेड), सारा लोवडेन (प्रोफेशनल गेम सामना अधिकारी लि.) यांंचा समावेश आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या सत्रांमध्ये भारतीय प्रशिक्षकांना आधुनिक फुटबॉलच्या पाच महत्त्वाच्या पैलूंवर प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये सामना दिवसाचे प्रभावी व्यवस्थापन, परिणामकारक सत्रांची आखणी, सत्राची रचना, निर्बंधाधारित प्रशिक्षण पद्धती आणि आत्मपरीक्षणात्मक प्रशिक्षण यांचा समावेश आहे. हे प्रशिक्षक केवळ हॉटेलमधील सत्रांपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष मैदानावर जाऊन भारतीय क्लबच्या सत्रांना भेटी देत वैयक्तिक मार्गदर्शनही करत आहेत.
मैदानावर प्रत्यक्ष अनुभव
या प्रशिक्षकांनी मडगाव येथील डॉन बॉस्को मैदान आणि राय पंचायत मैदानावर १६ वर्षांखालील मुलांचे सामने पाहून भारतीय फुटबॉलच्या सध्याच्या दर्जाचा आढावा घेतला. ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचे सीईओ नील शाह म्हणाले, ही भागीदारी ज्ञान देवाणघेवाणीवर आधारित आहे. भारतीय प्रशिक्षकांमधील शिकण्याची आणि सहकार्य करण्याची वृत्ती प्रेरणादायी आहे.
रिलायन्स फाउंडेशनचे सहाय्यक प्रशिक्षक हर्ष रॉय म्हणाले, प्रीमियर लीग प्रशिक्षकांसोबत काम केल्याने बारकावे समजतात आणि विचार करण्याची प्रक्रिया अधिक प्रगल्भ होते. मिनर्व्हा अकादमीचे तांत्रिक संचालक सुरिंदर सिंग म्हणाले, या व्यावसायिक पद्धतीमुळे भारतीय फुटबॉलच्या प्रगतीला मोठी गती मिळेल. या उपक्रमामुळे भारतीय फुटबॉल प्रशिक्षकांची कार्यक्षमता वाढून त्याचा थेट फायदा तळागाळातील खेळाडूंना होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.