कुंकळ्ळी पोलिसांकडून गुन्हा नोंद

मडगाव : कुंकळ्ळी येथील बेकलेमवाडा येथील अंध महिलेला जेवण व उपचारासाठी पैसे नाकारत छळ करण्यात आला. तसेच शौचालय बंद करून घेत उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी पाठवले. याप्रकरणी संशयित भिकू नाईक देसाई व कुटुंबीयांविरोधात कुंकळ्ळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
ही घटना २८ एप्रिलपूर्वीची असून पीडित महिला अंध असून ती संशयितांची नातेवाईक आहे. अंध महिला संशयिताकडे जेवण आणि वैद्यकीय उपचारांसाठी ठेवलेले पैसे मागण्यास गेली असता संशयितांनी तिला शिवीगाळ करत धमकावले. संशयितांनी पीडित महिला वापरत असलेल्या शौचालयात माती टाकून ते कुलूप लावून बंद केले. यामुळे पीडित अंध महिलेला नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जाणे भाग पडले. मूलभूत गरजांपासून वंचित ठेवून तिला अमानवीय वागणूक दिल्याचा ठपका संशयितांवर ठेवण्यात आला आहे. पीडितेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून, कुंकळ्ळी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक साहिल पागी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.