मयडेत पंच सदस्य लवू ठाकूरवर हल्ला

म्हापसा पोलिसांकडून बेळेकर बापलेकाविरुद्ध गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th May, 11:18 pm
मयडेत पंच सदस्य लवू ठाकूरवर हल्ला

म्हापसा : मयडे येथे पंच सदस्य लवू ठाकूर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून बापलेकाने हल्ला केला. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले आहेत. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी चिराग बेळेकर व जयेश बेळेकर (रा. मयडे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना बुधवारी ६ रोजी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास मयडे क्लब जवळील चिकन सेंटर समोर घडली. याप्रकरणी जखमी लवू ठाकूर यांचे भाऊ शेखर ठाकूर यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली आहे.

लवू ठाकूर हे म्हापसा येथून आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. बस्तोडा येथील बेळेकर हॉलजवळून संशयित आरोपी चिराग बेळेकर याने बुलेट मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. वाटेत बर्‍याचवेळी दुचाकी पुढे नेऊन ठाकूर यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळपास दोन-अडीच किलोमीटरवर पाठलाग केला. घटनास्थळी लवू यांच्या दुचाकीला मागून धडक देत त्यांना जमिनीवर पाडले. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी संशयिताने वडील जयेश बेळेकर यांना घटनास्थळी पाचारण केले. जयेश हे बुलेट मोटारसायकलवरून आले. त्यांनी दुचाकीने ठोकर देत ठाकूर यांना जमिनीवर पाडले. दोघाही संशयितांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर जीवे मारण्याची धमकी देत दोघाही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

जखमी ठाकूर यांना रुग्णवाहिकेतून प्रथम हळदोणा आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी म्हापसा जिल्हा इस्पितळात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे संशयित बापलेकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून फरार संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक अजय गावकर हे करीत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हळदोणाचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी जिल्हा इस्पितळात जखमी लवू ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसेच लोकप्रतिनिधींवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदवला. 

हेही वाचा