मुलीच्या वडिलांकडून तक्रार दाखल

वास्को : दहा लाख रुपये रोख व पाच तोळे सोने दिल्याशिवाय लग्न होणार नाही, असे ऐनवेळी सांगणारा नवरा मुलगा, त्याचे आईवडिल यांच्या विरोधात वास्को पोलिसांनी हुंडाविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी त्यांना लवकरच नोटीस काढण्यात येऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. मुलीच्या वडिलांनी वास्को पोलीस स्थानकात सदर तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगोरहिल येथे राहणाऱ्या एका मुलीचे लग्न चिंबल-पणजीतील रशिद याच्याशी होणार होते. या लग्नाच्या बोलणीप्रसंगी हुंडासंबंधी कोणताही व्यवहार झाला नव्हता. तथापी २९ एप्रिलला नवरा मुलगा, त्याच्या आईवडिलाने मुलीच्या वडिलांकडे हुंड्याची मागणी केली. लग्न ठरतेवेळी हुंडासंबंधी काहीच बोलणी झाली नव्हती. त्यामुळे ऐनवेळी हुंड्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने मुलीच्या आईवडिलांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
नवरा मुलगा व त्याच्या आईवडिलांनी दहा लाख रुपये रोख व पाच तोळे सोने पाहिजेत अशी मागणी केली. सदर मागणी पुरी झाल्याशिवाय लग्न होणार नसल्याची धमकी दिली. मुलीच्या वडिलांनी व इतरांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. तथापी त्यांनी हुंड्याचा हट्टच धरला होता. त्यामुळे मुलीच्या वडिलांना पोलीस तक्रार करण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. याप्रकरणी वास्को पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ तसेच भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली गुन्हा नोंद केला. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक डेव्हिड कॉस्ता अधिक चौकशी करीत आहेत.