पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित न केल्यास मंगळवारी पोलीस स्थानकात बेमुदत आंदोलन

वाळपई येथील मोईन शेख आत्महत्या प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 11:41 pm
पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित न केल्यास मंगळवारी पोलीस स्थानकात बेमुदत आंदोलन

वाळपई : मोईन शेख याला पोलीस कोठडीत मारहाण करण्यात आल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणातील जबाबदार पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश गावस, एक सहाय्यक उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा पोलीस स्थानकावर मंगळवारी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वाळपई पोलीस स्थानकासमोर आंदोलन सुरू असून, सरकारने उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांची राखीव दलात बदली केली असली तरी अद्याप निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच इतर संबंधित कर्मचाऱ्यांवरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

कुटुंबीयांनी इशारा दिला आहे की, सोमवारी संध्याकाळपर्यंत कारवाई न झाल्यास मंगळवारी पुन्हा पोलीस स्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देऊन या प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी केली आहे.

तक्रारदारालाच अटक; कोठडीत मारहाणीचा आरोप

मोईम शेख हा आपल्या मैत्रीण व तिच्या परिचिताकडून झालेल्या मारहाणीची तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या रविवारी वाळपई पोलीस स्थानकात गेला होता. मात्र, तक्रार नोंदवण्याऐवजी चौकशी अधिकारी प्रथमेश गावस यांनी त्याच्यावरच गुन्हा दाखल करून अटक केली. रात्री कोठडीत त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर मानसिक तणावामुळे मोईन याने बुधवारी घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे वाळपई परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाणीचे दृश्य स्पष्ट

या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोईन शेख याला कोठडीत मारहाण करण्यात आल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी संबंधित फुटेज मिळवून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.

सोमवारी रात्रीपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंगळवारपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कुटुंबीय व नागरिक संतप्त झाले असून, आता कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

निलंबन, बडतर्फीची मागणी कायम

आंदोलनकर्ते व कुटुंबीयांनी स्पष्ट केले की, केवळ बदली पुरेशी नसून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून शक्य असल्यास सेवेतून बडतर्फ करावे. तसेच या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.