दोन नव्या आमदारांना संधी : एका मंत्र्याला वगळणार

पणजी : राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच दोन नवीन आमदारांचा समावेश होणार असून, त्यासाठी विद्यमान एका मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्वाने मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, या कामगिरीच्या अहवालावरच हा निर्णय अवलंबून असेल, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. पावसाळ्यानंतर राज्यात कधीही विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू करण्याचा सल्ला राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांना दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची कामगिरी तपासली जाणार
नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीत निवडणुकांसह मंत्रिमंडळ फेरबदलावरही चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्वाने मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन सुरू करून त्यांचे ‘प्रगतीपुस्तक’ तयार केले असून, निवडणूक तयारीत हे प्रगतीपुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त आहे. आगामी निवडणुकांचा विचार करता महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ही जागा एका महिला आमदाराला देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिक्त असलेल्या जागी महिला आमदाराला संधी देऊन महिला सक्षमीकरणावर भर
याशिवाय आणखी एका आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मागील वेळी दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांचा एकाच वेळी शपथविधी झाला होता. आता एका महिला आमदारासह आणखी एका आमदाराचा समावेश करण्यासाठी एका विद्यमान मंत्र्याला राजीनामा द्यावा लागू शकतो. काही मंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आलेक्स सिक्वेरा उपचारासाठी दिल्लीला गेले होते, तर गोविंद गावडे यांच्यावर कला अकादमीच्या कामांबाबत आरोप झाले होते. आता पुन्हा एकदा मंत्र्यांची कामगिरी आणि पक्षासाठीचे योगदान यावर आधारित कठोर निर्णय घेतला जाणार आहे.
विद्यमान मंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह; नवीन चेहऱ्यांसाठी निकष ठरवण्यास सुरुवात
रवी नाईक यांच्या जागी नवीन मंत्र्याचा समावेश करणे तसेच आणखी एका आमदाराला मंत्रिपद देण्यासाठी कोणत्या विद्यमान मंत्र्याला वगळायचे, यासाठी निकष ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. या अनुषंगाने सध्या मुख्यमंत्री आणि पक्षस्तरावर सविस्तर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. रवी नाईक यांच्या निधनाला आता पाच महिने उलटून गेले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने हे मंत्रिपद दीर्घकाळ रिक्त ठेवणे पक्षासाठी योग्य ठरणार नाही. त्यामुळे तातडीने निर्णय न घेतल्यास आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळ फेररचना न झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भीती