आमिषांना बळी पडून फसव्या संस्थांमध्ये गुंतवणूक करू नका!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : फ्युचर वेल्थ गोवा परिषदेचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st May, 09:46 pm
आमिषांना बळी पडून फसव्या संस्थांमध्ये गुंतवणूक करू नका!

पणजी : गेल्या सात वर्षांत आर्थिक गुन्हे विभागात ५०० ते १ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीची प्रकरणे नोंद झाली आहेत. नागरिकांनी जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून नोंदणी नसलेल्या संस्थांमध्ये गुंतवणूक करू नये. फसवणूक टाळण्यासाठी पदवी शिक्षण स्तरावर आर्थिक साक्षरता सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पणजीतील गोवा मनोरंजन संस्थेच्या मॅकनेजी पॅलेसमध्ये ‘फ्युचर वेल्थ गोवा परिषद २०२६’च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी जीसीसीआयच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड, मुंबईचे सल्लागार डॉ. अजित मनियाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आणि आमिषांना बळी पडू नका

'तुमचे पैसे दुप्पट करून देतो, गुंतवणुकीवर ६ टक्के जास्त परतावा देतो' अशा आमिषांना अनेक लोक बळी पडले आणि त्यांचे पैसे घेऊन गुन्हेगार लंडन, दुबई तसेच इतर राज्यांत पळून गेले. पैसे गमावल्यानंतर लोक सरकारला दोष देतात; मात्र सुरुवातीला गुंतवणूक लपवून केली जाते आणि सरकारला त्याची कोणतीही माहिती दिली जात नाही. सुरुवातीलाच तक्रार केली असती तर कारवाई तत्काळ झाली असती. गोव्यातील लोकांकडे पैसे आहेत; मात्र कुठेही गुंतवणूक करण्याऐवजी त्यांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

क्रिप्टो आणि फॉरेक्स गुंतवणुकीतून गोमंतकीयांची ५०० ते १००० कोटींची फसवणूक

५० हजारांपासून ते ५ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करून फसवणूक झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. गेल्या सात वर्षांत क्रिप्टो आणि फॉरेक्समधील गुंतवणुकीतून ५०० ते १ हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. गोव्यातील नागरिकांनी अनावश्यकपणे अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे अनेकांचे आयुष्यभराची पुंजी गेल्याचे धक्कादायक वास्तव यावेळी मांडण्यात आले.

विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षर करण्यासाठी पदवी स्तरावर नवा अभ्यासक्रम

पदवी स्तरावर आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक बाबींचे ज्ञान देणे ही काळाची गरज असून त्यासाठी शिक्षकांना प्रथम प्रशिक्षण देऊन नंतर पदवी स्तरावर हे शिक्षण सुरू केले जाईल. त्यानंतर ते प्राथमिक स्तरापर्यंत नेण्याचा विचार आहे. असे केल्यास आर्थिक फसवणूक कमी होण्यास मदत होईल. शिक्षण क्षेत्रातील या बदलामुळे भविष्यातील गुंतवणूकदार अधिक सुज्ञ आणि सतर्क होतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

गोव्यातील बँकिंग नेटवर्क आणि जनधन खात्यांची वाढती व्याप्ती

गोव्यात सुमारे १५ लाख लोकसंख्येसाठी ८०७ बँक शाखा आहेत. म्हणजेच प्रत्येक शहर किंवा गावात एक बँक शाखा उपलब्ध आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सरकारने २.६ लाख बँक खाती उघडली असून त्यामध्ये एकूण १,१९२ कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच विविध बँकांनी गावागावांत ९६६ आर्थिक साक्षरता शिबिरे आयोजित केली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या अधिकृत बँकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

#PramodSawant #FinancialLiteracy #GoaNews #InvestmentScam #FutureWealthGoa #EconomyNews #Panaji #MarathiNews