शिक्षणाने व्यक्तीला सक्षम बनवायला हवे, त्याला असुरक्षिततेत ढकलायला नव्हे, आणि म्हणूनच आज गरज आहे ती अशा व्यवस्थेची जी उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना योग्य संधी देईल आणि पीएच.डी. ही अस्थैर्याचे नव्हे तर सुरक्षित, सन्माननीय आणि अर्थपूर्ण भविष्याचे प्रतीक बनेल, याची.

अाजच्या समाजात शिक्षणाला यशाची गुरुकिल्ली मानले जाते आणि त्यातही पीएच.डी. ही पदवी शिक्षणातील सर्वोच्च टप्पा म्हणून गौरवली जाते, कारण ती अनेक वर्षांच्या परिश्रम, संशोधन, त्याग आणि ज्ञानाच्या सखोलतेचे प्रतीक असते; परंतु आज अनेक संशोधकांच्या मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न सतत उभा राहतो आणि तो म्हणजे जर इतके उच्च शिक्षण घेतल्यानंतरही स्थिर आणि कायमस्वरूपी नोकरी मिळत नसेल, तर या शिक्षणाचा नेमका उपयोग काय? हा प्रश्न केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहे, विशेषतः गोव्यासारख्या लहान राज्यात, जिथे शिक्षणाचा दर्जा चांगला असूनही उच्च शिक्षण संस्थांची संख्या मर्यादित आहे आणि त्यामुळे कायमस्वरूपी प्राध्यापक पदांच्या संधी अत्यंत कमी आहेत; परिणामी अनेक पीएच.डी. धारकांना गेस्ट लेक्चरर किंवा कराराधारित पदांवर काम करावे लागते, ज्यामुळे अनुभव मिळतो खरा पण आर्थिक आणि व्यावसायिक स्थैर्य मिळत नाही, आणि हीच परिस्थिती अपेक्षा आणि वास्तव यातील मोठी दरी स्पष्ट करते. आपल्या समाजात अजूनही असा समज आहे की जास्त शिक्षण म्हणजे हमखास चांगली नोकरी आणि सुरक्षित भविष्य, पण प्रत्यक्षात अनेक उच्चशिक्षित व्यक्तींना अस्थिरतेचा सामना करावा लागतो; या परिस्थितीमागे अनेक प्रणालीगत अडचणी आहेत जसे की दरवर्षी वाढणारी पीएच.डी. धारकांची संख्या पण त्यानुसार न वाढणाऱ्या नोकऱ्या, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मर्यादित पदे, भरती प्रक्रियेमधील विलंब, तसेच उद्योग आणि शिक्षण यामधील तफावत, कारण अनेक संशोधन प्रकल्प हे केवळ शैक्षणिक मर्यादेत राहतात आणि त्यांचा प्रत्यक्ष उद्योग किंवा समाजाशी संबंध कमी असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्यांची कमतरता जाणवते; याचा परिणाम केवळ करिअरवरच नाही तर मानसिक आणि सामाजिक पातळीवरही होतो.
अनेक वर्षांच्या मेहनतीनंतरही अपेक्षित यश न मिळाल्यामुळे निराशा, आत्मविश्वास कमी होणे आणि आर्थिक ताण वाढणे ही सामान्य गोष्ट बनली आहे. “अतिशिक्षित पण बेरोजगार” ही स्थिती अनेकांसाठी वास्तव ठरली आहे; तरीही याचा अर्थ असा नाही की पीएच.डी. करणे निरर्थक आहे, कारण ही पदवी व्यक्तीमध्ये चिकित्सक विचारशक्ती, संशोधन क्षमता आणि समाजासाठी योगदान देण्याची दृष्टी विकसित करते, परंतु पीएच.डी. म्हणजे हमखास स्थिर नोकरी मिळेल हा समज बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी पीएच.डी. धारकांनी पारंपरिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच इतर पर्यायी संधींकडेही पाहणे आवश्यक आहे, जसे की पर्यावरण सल्लागार क्षेत्र, जैवतंत्रज्ञान आणि औषधनिर्मिती उद्योग, वैज्ञानिक लेखन, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजकता, ज्यामध्ये त्यांच्या ज्ञानाचा प्रभावी वापर होऊ शकतो; याचबरोबर सरकार आणि शैक्षणिक संस्थांनीही काही मूलभूत बदल करणे गरजेचे आहे.
शिक्षण आणि उद्योग यामध्ये अधिक समन्वय निर्माण करणे, संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध करून देणे, नवीन पदनिर्मिती करणे, कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर करणे आवश्यक आहे, कारण योग्य वेळी संधी मिळाल्यास अनेक पात्र उमेदवार देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात; शेवटी, पीएच.डी. ही केवळ पदवी नसून ज्ञान, मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक आहे, परंतु त्या ज्ञानाचा योग्य सन्मान आणि उपयोग होण्यासाठी प्रणालीत बदल होणे अत्यावश्यक आहे. शिक्षणाने व्यक्तीला सक्षम बनवायला हवे, त्याला असुरक्षिततेत ढकलायला नव्हे, आणि म्हणूनच आज गरज आहे ती अशा व्यवस्थेची जी उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना योग्य संधी देईल आणि पीएच.डी. ही अस्थैर्याचे नव्हे तर सुरक्षित, सन्माननीय आणि अर्थपूर्ण भविष्याचे प्रतीक बनेल, याची. शिक्षण हे जगण्याचेही शाश्वत साधन बनायला हवे.
