प्रोटीन हे फक्त स्नायू किंवा बॉडीबिल्डिंगसाठी नाही. ते केस, त्वचा, नखं, ताकद, रिकव्हरी, रोगप्रतिकारशक्ती, आणि वय वाढताना स्नायूंचं प्रमाण आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीर मजबूत व कार्यक्षम ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

प्रोटीन हा अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक आहे. तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचा पाया आहे. शरीर नीट काम करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. तरीही आजही प्रोटीनबद्दल अनेक गैरसमज आहेत. अनेक वेळा लोक विनाकारण प्रोटीन कमी करतात किंवा चुकीच्या गोष्टींसाठी त्याला दोष देतात. मग खरोखर प्रोटीनच समस्या आहे का, की आपल्या समजुतीतच काहीतरी त्रुटी आहे?
आजचा एक मोठा गैरसमज असा आहे की लो-फॅट प्रोटीन जास्त चांगले असते. त्यामुळे लोक अंड्याचा पांढरा भाग, लो-फॅट दूध, फॅट-फ्री पनीर किंवा खूपच कमी फॅट असलेले मांस निवडतात. पण निसर्गात प्रोटीन वेगळं मिळत नाही. नैसर्गिक अन्नामध्ये प्रोटीनसोबत फॅटही असते, जे पोट भरल्यासारखं वाटण्यासाठी, हार्मोनल संतुलनासाठी आणि पोषकतत्त्वांच्या शोषणासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्रोटीन वेगळं काढण्यापेक्षा ते नैसर्गिक स्वरूपात खाणं अधिक योग्य आहे.
अजून एक समज म्हणजे प्रोटीनमुळे युरिक अॅसिड वाढतं. पण प्रत्यक्षात युरिक अॅसिड प्रोटीनमुळे नाही, तर प्युरीन नावाच्या घटकांच्या विघटनामुळे तयार होतं. हे प्युरीन अन्नातून येतातच, पण शरीरातील पेशींच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळेही तयार होतात. त्यामुळे युरिक अॅसिड तयार होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. युरिक असिड वाढण्यामागे जास्त रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स, साखर विशेषतः ज्यूस आणि थंड पेयांमधील फ्रुक्टोज कमजोर मेटाबोलिक आरोग्य आणि कमी पाणी पिणं हे कारणीभूत असतात.
प्रोटीन किडनीला नुकसान करतं हा देखील एक गैरसमज आहे. निरोगी व्यक्तींमध्ये किडनी शरीरातील कचरा फिल्टर करण्याचं काम व्यवस्थित करते आणि प्रोटीनच्या प्रमाणानुसार जुळवून घेते. फिल्ट्रेशन वाढणं हे नैसर्गिक आहे, नुकसान नाही. किडनीच्या समस्यांमध्ये जास्त साखर, दीर्घकालीन दाह (inflammation) आणि खराब मेटाबोलिक आरोग्य हे अधिक महत्त्वाचे घटक असतात.
तसंच, प्रोटीन लिव्हरला नुकसान करतं हा समजही चुकीचा आहे. लिव्हर दररोज प्रोटीनचं प्रोसेसिंग करतं आणि कचरा शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. लिव्हरच्या समस्या मुख्यतः आधीपासून असलेल्या आजारांमध्ये किंवा जास्त साखर आणि अल्कोहोलमुळे दिसतात.
प्रोटीनबद्दल अजूनही काही सामान्य गैरसमज आहेत. फक्त जिम करणाऱ्यांनाच प्रोटीन लागतो असं नाही प्रोटीन प्रत्येकासाठी आवश्यक आहे. डाळी आणि कडधान्ये प्रोटीन देतात, पण ते एकट्याने पुरेसं नसू शकतं. धान्य आणि तृणधान्ये (ज्वारी, बाजरी, नाचणी) हे मुख्यतः कार्बोहायड्रेटचे स्रोत आहेत ते प्रोटीनचे मुख्य स्रोत नाहीत. पचनाचा त्रास हा बहुतेक वेळा पोटाच्या आरोग्याशी संबंधित असतो, प्रोटीनमुळे नाही. प्रोटीनमुळे शरीर खूप मोठं (bulky) होतं किंवा वय वाढल्यावर त्याची गरज कमी होते. हेही गैरसमज आहेत.
हे सगळे गैरसमज आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. लोक प्रोटीन कमी करतात आणि कार्बोहायड्रेट्स जास्त खातात. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटत नाही, भूक वाढते आणि जास्त खाणं होतं. हळूहळू यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. आणि ‘हेल्दी’ खाण्याच्या प्रयत्नात आपण नकळत शरीराला खरंच काय हवं आहे त्यापासून दूर जातो.
खरं तर प्रोटीन समस्या नाही समस्या आहे त्याबद्दलचा गोंधळ आणि माहितीचा अभाव. त्यामुळे अनेक वेळा लोक प्रोटीन टाळतात किंवा पुरेसं घेत नाहीत. टोकाच्या गोष्टींवर भर न देता, प्रोटीनची योग्य समज करून ते रोजच्या आहारात संतुलित प्रमाणात आणि सातत्याने समाविष्ट करण्यावर लक्ष असायला हवं.
आपल्या जेवणाच्या पद्धतीत भातासोबत डाळ किंवा करी, आणि भाजीसोबत पोळी/चपाती प्रोटीन अनेकदा साइड डिशसारखंच राहतो, त्यामुळे त्याचं प्रमाण नकळत कमी पडतं. त्यामुळे अनेक वेळा पोट आधी कार्बोहायड्रेट्सने भरतं आणि प्रोटीन कमी पडतं. म्हणून जेवताना एक सोपा बदल उपयोगी ठरू शकतो. आधी प्रोटीनयुक्त अन्न जसे की मासे, अंडी, चिकन किंवा पनीर, त्यासोबत डाळ किंवा कडधान्ये, मग भाजी, आणि शेवटी पोळी/भाकरी किंवा भात. या क्रमाने खाल्ल्यास पोट पूर्णपणे कार्बोहायड्रेट्सने न भरता प्रोटीन पुरेसं घेणं सोपं आणि फायदेशीर ठरतं.
प्रोटीन हे फक्त स्नायू (muscles) किंवा बॉडीबिल्डिंगसाठी नाही. ते केस, त्वचा, नखं, ताकद, रिकव्हरी, रोगप्रतिकारशक्ती, आणि वय वाढताना स्नायूंचं प्रमाण (lean muscle mass) आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीर मजबूत व कार्यक्षम ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः वय वाढल्यावर प्रोटीन अधिक आवश्यक ठरतं कारण ते स्नायूंची ताकद टिकवून ठेवायला, चालणं-फिरणं सोपं ठेवायला, पडण्याचा धोका कमी करायला आणि स्वावलंबन टिकवून ठेवायला मदत करतं.
म्हणून खरा बदल इथून सुरू होतो. गैरसमजांमुळे प्रोटीन टाळणं थांबवा आणि त्याला प्राधान्य द्या. प्रत्येक जेवणात प्रोटीनचा चांगला स्रोत घ्या आणि शक्य तितकं नैसर्गिक अन्न निवडा.
