रागाचा सिझन चालू आहे का?

राग संपवायचा नसतो, समजून घ्यायचा असतो. कारण राग म्हणजे आगच असेल, तर तिच्या धुरात नेहमी काहीतरी जळालेलं असतं. प्रश्न एवढाच असतो, की, समोरचा माणूस जळतोय, की त्याच्या आत काहीतरी खोल धगधगतंय?

Story: मनी मानसी |
01st May, 11:26 pm
रागाचा सिझन चालू आहे का?

यंदाच्या उन्हाळ्याने तापमानाचे नवे विक्रम मोडलेत म्हणे! हवामान खात्याने उष्णतेची लाट जाहीर केली आणि आपण चिडचिडीची. बाहेर सूर्य एवढा तापला आहे की रस्त्यावरील डांबरही विचार करत असेल, “मी वितळू का आधी लोक वितळतील?” नाही. हा काही चेष्टेचा विषय नव्हे परंतू गंमत अशी, की आपण पंखा, कूलर, एसी, 

पाणी, छत्री यांची व्यवस्था करतो 

उन्हाळ्यासाठी अॅमात्र मनाच्या तापमानासाठी आपण काही विचार करतो आहोत का? 

आजकाल राग हा प्रसंगानुसार येणारा पाहुणा राहिलेला नाही तर तो घरचा माणूस झाला आहे. बसमध्ये धक्का लागला की राग. रांगेत कुणी पुढे गेला की राग. व्हॉट्सअॅपला उत्तर उशिरा आलं की राग. सोशल मीडियावर कुणीतरी सुखात दिसलं की आतून कुरतडणारा राग. जणू प्रत्येकाच्या खिशात मोबाईलसोबत एक छोटा ज्वालामुखीही ठेवला आहे असंच वाटू लागले आहे, नाही का? 

पण मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर राग ही बहुतेकदा मूळ भावना नसते. ती दुय्यम भावना असते अर्थात सेकंडरी इमोशन (secondary emotion) म्हणजे प्रथम काहीतरी वेगळं घडतं, आणि नंतर त्यावर रागाचं कवच चढतं. आत दुखावलेपण असू शकतं, अपमानाची जखम असू शकते, नाकारले गेल्याची वेदना असू शकते, नियंत्रण सुटल्याची भीती असू शकते, किंवा अनेक वर्षं साठलेला व अव्यक्त राहिलेला त्रास असू शकतो.

अहो, “मला वाईट वाटलं” हे मान्य करणं आपल्यापैकी अनेकांना अवघड असतं. त्यात “मला भीती वाटते” हे बोलणं अजून कठीण. पण “मला राग आलाय” हे मात्र समाजमान्य आहे. म्हणून आपलं मन अनेकदा नाजूक भावना मागे लपवतं आणि पुढे रागाला उभं करतं. ह्यामुळे होतं काय की, राग हा आपल्या अनेकांच्या मनाचा अंगरक्षक बनतो. 

फ्रॉइडने डिफेन्स मेकॅनिझम (defense mechanisms) बद्दल बोलताना हेच सुचवलं होतं, मन स्वतःला सहन न होणाऱ्या भावनांपासून वाचवण्यासाठी विविध मार्ग वापरतं. त्यातला एक म्हणजे डिसप्लेसमेंट (displacement) ऑफिसमध्ये वरिष्ठांनी अपमान केला. तिथे प्रतिकार करणं शक्य नव्हतं. मग घरी आल्यावर मुलाने पेन हरवलं, आणि त्याच्यावर disproportionate राग. कारण मुळात पेन हरवणं इतकं मोठं नसतं, पण दिवसभर दाबलेला तो अपमान कुठेतरी बाहेर पडायला जागा शोधत असतो..व बिचाऱ्या त्या मुलावर ते सगळं 

निघतं. 

ह्यात, प्रोजेक्शन ही तितकंच रोचक असतं. स्वतःला आतून असुरक्षित वाटत असताना आपण दुसऱ्याला “तू खूप attitude दाखवतोस”, “तू मला कमी लेखतोस” असं म्हणतो. परंतू तो कधी कधी दुसऱ्याच्या वागण्यातला दोष कमी, आणि आपल्या आतल्या जखमेचा प्रतिध्वनी जास्त असतो.

बहुतेकवेेळा, रागाला फक्त वैयक्तिक कारणं नसतात, तर सामाजिक संदर्भही असतो. सततचा आर्थिक ताण, भविष्याची अनिश्चितता, स्पर्धा, तुलना, अस्थिर नोकऱ्या, झोपेची कमतरता, माहितीचा मारा, स्क्रीनचा अतिरेक हे सगळं आपल्या नर्वस सिस्टीमला कायम सज्ज अवस्थेत ठेवतं. शरीर सतत अर्लट मध्ये असेल, तर मनाची सहनशीलता कमी होणारच. Wi-Fi 5G झालं, पण भावनिक bandwidth कमी झाली.

आजच्या काळात त्वरित समाधानाची सवयही मोठा घटक आहे. दोन मिनिटांत अन्न, काही सेकंदांत व्हिडिओ, एका क्लिकवर वस्तू, आणि instant reply ची अपेक्षा. त्यामुळे उशीर हा फक्त उशीर राहत नाही तर तो अनादर वाटू लागतो. नकार हा फक्त मतभेद राहत नाही, तो व्यक्तिमत्त्वावर हल्ला वाटू 

लागतो.

घरातील राग वेगळ्या रूपात दिसतो. आई मुलावर होमर्वकसाठी ओरडते, पण मूळ प्रश्न असतो, “सगळं माझ्यावरच का?” वडील किरकोळ गोष्टीवर भडकतात, पण आत प्रश्न असतो, “मी पुरेसा आहे का?” वृद्ध व्यक्ती सतत चिडचिड करते, कारण तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या आहेत. किशोरवयीन मुलगा दार आपटतो, कारण त्याला शब्द सापडत नाहीत. प्रत्येक वर्तनामागे एक न उच्चारलेली कथा असते.

मग उपाय काय? फक्त “राग करू नका” हा उपाय नाही. तो पोस्टरवर शोभतो, जीवनात नाही.

१. रागाआधीची भावना ओळखा.

स्वतःला विचारा: मी दुखावलोय? मला दुर्लक्षित वाटतंय? मला भीती वाटतेय?

२. शरीराला regulate करा.

थंड पाणी, दीर्घ श्वास, थोडं चालणं, जागा बदलणं, हे नक्की करा. कारण नर्वस सिस्टीम शांत झाल्यावर विचार आपोआप बदलतो.

३. वेळ घेऊन प्रतिक्रिया द्या, झटपट नाही.

क्षणिक राग कायमस्वरूपी नुकसान करतो.

४. तुलना कमी करा.

Social media अनेकदा वास्तव नाही, निवडक प्रदर्शन असतं.

५. साठवू नका, व्यक्त व्हा.

न बोललेली खंत पुढे संताप बनते.

राग संपवायचा नसतो, समजून घ्यायचा असतो. कारण राग म्हणजे आगच असेल, तर तिच्या धुरात नेहमी काहीतरी जळालेलं असतं. प्रश्न एवढाच असतो, की, समोरचा माणूस जळतोय, की त्याच्या आत काहीतरी खोल धगधगतंय?


- मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४