शब्दांचे सामर्थ्य: सानवीची जिद्द

परीक्षेची भीती इतकी वाढली होती की, एक पेपर खराब गेला की त्याचा परिणाम ती दुसऱ्या पेपरवर करून घेत असे. निकाल घेण्यासाठी सरांसमोर जाण्याची तिला भीती वाटू लागली.

Story: स्वानुभव |
01st May, 11:13 pm
शब्दांचे सामर्थ्य:   सानवीची जिद्द

ही गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील. सानवी आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. घरची परिस्थिती बेताचीच असली, तरी आई-बाबांनी आपल्या परीने तिचे सर्व लाड पुरवले होते. सानवी दहावीत असताना तिने जसा जमेल तसा अभ्यास केला आणि तिला ६५ टक्के गुण मिळाले. त्या काळात ६५ टक्के म्हणजे खूप चांगले गुण समजले जायचे. सानवीने आधीच ठरवले होते की, गणित विषय घेऊन पुढचे शिक्षण घ्यायचे आणि शिक्षिका बनायचे; कारण तिला मुले खूप आवडायची आणि गणित विषयात तिला विशेष रुची होती.

विज्ञान विषय तिचा थोडा कच्चा होता, तरीही गणितातील चांगल्या गुणांमुळे तिला जवळच्याच एका उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. अकरावीचे वर्ष हसत-खेळत गेले. पहिल्या दोन परीक्षांमध्ये ती सहज उत्तीर्ण झाली, परंतु वार्षिक परीक्षा थोडी कठीण गेली. कशीबशी काठावरचे गुण मिळवून ती बारावीत पोहोचली.

बारावीत तिला आवडणारे विषय दोनच होते—एक गणित आणि दुसरा मराठी. बाकी विषय तिच्या डोक्यावरून जात होते. असे नव्हते की ती अभ्यास करत नव्हती; ती भरपूर मेहनत घ्यायची, पण प्रत्येकाची आकलनक्षमता वेगळी असते. केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी हे विषय तिला गोंधळात टाकत होते. बारावीच्या पहिल्या चाचणीत मुख्य तीन विषयांत तिला २० पैकी फक्त ६ गुण मिळाले, तर उत्तीर्ण होण्यासाठी ७ गुणांची गरज होती.

तिचा आत्मविश्वास हळूहळू डळमळीत होत होता. त्यातच तिच्या फिजिक्सच्या शिक्षकांनी सर्वांसमोर तिला सुनावले, "सानवी, तुला अभ्यासातलं काहीच जमत नाही, त्यापेक्षा तू सांस्कृतिक कार्यक्रमात तरी भाग घे, तेवढाच तुझा फायदा होईल!" हे शब्द ऐकून ती मनातून खचली. तिला वाटू लागले की, खरंच आपल्यात काहीच क्षमता नाही.

सहामाही परीक्षा आणि त्यानंतरची सराव परीक्षा (Prelims) यातही ती तिन्ही मुख्य विषयांत नापास झाली. परीक्षेची भीती इतकी वाढली होती की, एक पेपर खराब गेला की त्याचा परिणाम ती दुसऱ्या पेपरवर करून घेत असे. निकाल घेण्यासाठी सरांसमोर जाण्याची तिला भीती वाटू लागली.

एके दिवशी शाळेच्या वरांड्यात तिला तिचे मराठीचे शिक्षक, सामंत सर भेटले. त्यांनी आपुलकीने विचारले, "कसं काय चाललंय सानवी? सराव परीक्षेत किती मार्क मिळाले?" हे ऐकताच सानवीला रडू कोसळले. तिने आपली भीती आणि नापास झाल्याचे दुःख सरांजवळ व्यक्त केले. सामंत सरांनी सर्व काही शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, "सानवी, हे बघ बाळा, अजून एक महिना बाकी आहे. तू गणितासारख्या कठीण विषयात उत्तीर्ण होऊ शकतेस, तर बाकी विषय तुझ्यासाठी नक्कीच अवघड नाहीत. जिद्दीने अभ्यास कर, तुला नक्की जमेल!"

सरांच्या या शब्दांनी सानवीला उभारी दिली. 'माझ्याकडे खरंच कुवत आहे का? मी करू शकेन का?' या प्रश्नांचे उत्तर तिला सकारात्मक मिळाले. तिने महिनाभर अहोरात्र एक करून अभ्यास केला. बायोलॉजीचा पेपर असताना ती रात्रभर झोपली नाही. अखेर बारावीचा निकाल लागला आणि तिला ६० टक्के गुण मिळाले!

सामंत सरांच्या विश्वासामुळे सानवीने केवळ परीक्षाच जिंकली नाही, तर स्वतःचा आत्मविश्वासही परत मिळवला. पुढे तिने गणितात पदवी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

तात्पर्य: शिक्षकांचे शब्द विद्यार्थ्याचे आयुष्य घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात. सामंत सरांसारखे शिक्षक विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना नवी दिशा देतात. म्हणूनच, मुलांशी बोलताना प्रत्येक शिक्षकाने आपल्या शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव ठेवायला हवी.


- सौ. गौरी रोशन वेर्लेकर