अनेकदा प्रथिनांचे सेवन पुरेसे असले तरी शरीर त्यांचा योग्य उपयोग करू शकत नाही. त्यामुळे प्रथिने पचत नाहीत या अनुभवामुळे अनेकजण प्रथिने टाळण्यास सुरुवात करतात.

प्रथिने ही स्नायूंची बांधणी व दुरुस्ती, हार्मोन्स आणि एन्झाइम्सची निर्मिती तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यावश्यक आहेत. ती अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, डाळी, कडधान्ये आणि सोया यांसारख्या स्रोतांमधून मिळतात. अनेक प्रौढांसाठी दररोजची प्रथिनांची गरज साधारणतः ७०-१०० ग्रॅमपर्यंत असू शकते, मात्र ही गरज वजन, आरोग्य आणि जीवनशैलीनुसार बदलते.
योग्य प्रथिनांचे स्रोत निवडणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे पुरेशा प्रमाणात आणि सातत्याने सेवन करणेही आवश्यक आहे. प्रत्येक जेवणात प्रथिनांचा स्रोत समाविष्ट केल्यास दिवसभर संतुलन राखणे सोपे होते. प्रोटीन फक्त साइड डिश म्हणून न ठेवता, ते जेवणाचा मुख्य भाग बनवा. ताटात प्रथिने स्पष्ट आणि आकर्षक दिसतील याकडे लक्ष द्या कारण जे दिसायला सोपं आणि रुचकर असतं, ते सवयीचा भाग बनवणंही सोपं होतं.
प्रथिने खाणे ही फक्त एक बाजू आहे. शरीराने ती नीट पचवून, शोषून आणि वापरता येणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
“प्रथिने खाल्ल्यावर जडपणा, गॅस, फुगणे, जळजळ, बद्धकोष्ठता किंवा अस्वस्थता का जाणवते?”
प्रथिनांचे पचन पोटात सुरू होते. येथे गॅस्ट्रिक आम्ल (HCl) आणि पेप्सिनसारखी एन्झाइम्स प्रथिनांचे विघटन करण्यास सुरुवात करतात. ही प्रक्रिया योग्यरीत्या होण्यासाठी पोटातील आम्ल आणि एन्झाइम्सची कार्यक्षमता महत्त्वाची असते.
परंतु आजच्या आहारपद्धतीत वारंवार खाणे, अपुरा व असंतुलित आहार, रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे जास्त प्रमाण आणि अनियमित जेवणाच्या वेळा या सर्वांचा पोटातील आम्ल निर्मितीवर परिणाम होतो. याशिवाय, अनेक आहारांमध्ये उच्च दर्जाच्या प्रथिनांचे प्रमाण आणि सेवनाची सातत्यता दोन्ही कमी असते.
या कारणांमुळे कालांतराने पचनसंस्था कमकुवत होऊ शकते आणि पोटातील आम्लाचे प्रमाण घटू शकते. परिणामी, प्रथिनांचे पचन पूर्णपणे आणि प्रभावीपणे होत नाही ज्यामुळे जडपणा, फुगणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
अनेकदा प्रथिनांचे सेवन पुरेसे असले तरी शरीर त्यांचा योग्य उपयोग करू शकत नाही. त्यामुळे प्रथिने पचत नाहीत या अनुभवामुळे अनेकजण प्रथिने टाळण्यास सुरुवात करतात.
आज गॅस आणि फुगणे या तक्रारी खूप सामान्य झाल्या आहेत. या तक्रारी अनेकदा एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थावर ढकलल्या जातात, परंतु प्रत्यक्षात त्या पचनसंस्था किती सक्षम आहे याचे द्योतक असू शकतात. त्यामुळे अन्नपदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी पचन सुधारण्यावर भर देणे अधिक महत्त्वाचे ठरते.
उदाहरणार्थ, दूध पिल्यावर होणारी अस्वस्थता अनेकदा लॅक्टोज इन्टॉलरन्स म्हणून ओळखली जाते. काही लोकांमध्ये ही समस्या खरोखरच असते, परंतु अनेक वेळा ती पूर्णपणे असहिष्णुतेची नसून अपुऱ्या पचनाशी संबंधित असू शकते.
फक्त पोटातील आम्ल कमी असणे हेच कारण नसते. याशिवाय एन्झाइम्सची कमी कार्यक्षमता, आतड्यांतील सूज किंवा इतर समस्या, मायक्रोबायोममधील असंतुलन, अपुरा पाण्याचा पुरवठा आणि दीर्घकालीन ताण हे घटक देखील प्रथिनांच्या पचन आणि उपयोगावर परिणाम करू शकतात.
प्रथिनांचे पचन सुधारण्यासाठी गुंतागुंतीच्या उपायांची गरज नसते. सोप्या आणि सातत्यपूर्ण सवयी पुरेशा ठरतात. सावकाश खाणे आणि अन्न नीट चावून खाणे, जेवणांमध्ये योग्य अंतर ठेवणे आणि सतत खाण्याची सवय टाळणे यामुळे पचनसंस्थेला योग्य प्रकारे काम करण्यासाठी वेळ मिळतो. भाज्या आणि पुरेसे फायबर आहारात घेतल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. पुरेसं पाणी पिणं तितकंच गरजेचं आहे.
आहारात नैसर्गिक आंबट आणि किण्वित पदार्थ (उदा. दही, ताक, घरी बनवलेले लोणचे) समाविष्ट केल्यास पचन सुधारण्यास मदत होते.
जर प्रथिनांचे सेवन पूर्वी कमी असेल, तर ते अचानक वाढवण्याऐवजी हळूहळू वाढवणे महत्त्वाचे आहे. यामुळे पचनसंस्थेला त्यानुसार जुळवून घेता येते आणि जडपणा किंवा फुगणे यांसारख्या तक्रारी कमी होतात.
