कामिनी बाई : आयुष्याचं गणित सोडवणारी माऊली

दुर्दैवाने मी नववीत नापास झाले आणि बाबांनी माझं लग्न लावून दिलं. शिक्षण सुटलं, पण बाईंनी दिलेली ती शिकवण कायम राहिली की 'जीव देणं हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही.’

Story: स्वानुभव |
24th April, 09:42 pm
कामिनी बाई :  आयुष्याचं गणित सोडवणारी माऊली

बागेत मुलांच्या खेळाच्या आवाजात मृण्मयी आणि स्नेहा या दोन जिवलग मैत्रिणी हरवून गेल्या होत्या. संसाराच्या रहाटगाडग्यात अनेक वर्षे उलटली होती, पण आज अचानक झालेल्या या भेटीने शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. गप्पांच्या ओघात मृण्मयीचा चेहरा थोडा गंभीर झाला.

​ती म्हणाली, "स्नेहा, आजही मी तो दिवस विसरू शकत नाही ग. तो दिवस, तो प्रसंग आणि माझ्या कामिनी बाई... त्यांनी मला केवळ वाचवलंच नाही, तर जगायचं बळ दिलं."

​स्नेहा कुतूहलाने ऐकू लागली. मृण्मयी पुढे सांगू लागली, "तुला आठवतंय? मी सातवीत असताना आई वारली. घराची सगळी ओढाताण, बाबांनी केलेलं दुसरं लग्न आणि त्यातून आलेलं मानसिक दडपण... आम्ही पोरकी झालो होतो. एका सकाळी गडबडीत मी डोक्याला रिबीन न बांधताच, फक्त रबर बँड लावून शाळेत गेले. आई असती तर तिने नीट वेण्या घातल्या असत्या, पण तिथे पाहणारं कोणी नव्हतं."

​"शाळेत गेल्यावर पीटीच्या (शारीरिक शिक्षण) तासाला सावंत सर माझ्यावर एवढे डाफरले की माझं त्राणच सुटलं. आधीच घराचं वातावरण कडू झालं होतं, त्यात सरांचा तो अपमान... मला वाटलं आता जगून काहीच उपयोग नाही. मी तडक शाळेच्या गेटबाहेर पळाले. शाळेजवळच्या त्या नदीत उडी मारून जीव द्यायचा, एवढाच विचार डोक्यात होता."

​मृण्मयीचा आवाज थरथरला, "मी पळत होते आणि माझ्या मागे सावंत सर ओरडत येत होते. समोरच्या वर्गात कामिनी बाई शिकवत होत्या. सरांचा आवाज ऐकून त्याही बाहेर आल्या. त्यांना काहीच कल्पना नव्हती की मी का पळतेय, पण अनर्थ ओळखून त्या स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या मागे धावल्या. कधीही न पळणाऱ्या बाई त्या दिवशी एखाद्या सावलीसारख्या माझ्या मागे आल्या आणि नदीकाठी पोहोचण्याआधीच त्यांनी मला घट्ट पकडलं."

​"त्यांनी मला वर्गात नेलं, पाणी पाजलं. मी त्यांच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडले ग. त्या क्षणी मला माझ्या आईची उणीव भासली नाही, कारण त्यांच्या रूपात मला माझी आईच भेटली होती. त्यानंतर मराठीच्या पेपरमध्ये 'माझी आवडती शिक्षिका' हा निबंध आला. मी मनापासून त्यांच्याबद्दल लिहिलं. योगायोगाने त्या त्याच सुपरव्हिजनला होत्या. फिरता फिरता त्यांनी माझं लिखाण वाचलं, त्यांच्या डोळ्यात कौतुक होतं, पण मी कधीच समोरून त्यांना सांगू शकले नाही."

​मृण्मयीने सुस्कारा सोडला, "दुर्दैवाने मी नववीत नापास झाले आणि बाबांनी माझं लग्न लावून दिलं. शिक्षण सुटलं, पण बाईंनी दिलेली ती शिकवण कायम राहिली की 'जीव देणं हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही.' आज मी संसारात सुखी आहे, पण माझ्या मुलीला खूप शिकवायचं आणि तिला स्वावलंबी बनवायचं हेच माझं स्वप्न आहे."

​स्नेहाने मृण्मयीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "खरे आहे ग, कामिनी बाई फक्त गणित शिकवत नाहीत, तर आयुष्याचं कोलांट्या उड्या खाणारं गणित कसं सोडवायचं हेही शिकवतात. चल, आपण नक्कीच त्यांना भेटायला जाऊया!”


- सौ गौरी रोशन वेर्लेकर