महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही केवळ गरज नाही, तर जबाबदारी आहे. कारण घर, कुटुंब आणि समाज यांची उभारणी करणारी स्त्रीच जर थकलेली असेल, तर त्या सगळ्याचं संतुलन बिघडू शकतं.

आज पुन्हा काहीच करायची इच्छा नाहीये...” किचनमध्ये उभी असताना सीद्धी स्वतःशीच पुटपुटली. गॅसवर चहा उकळत होता, पण तिचं लक्ष तिकडे नव्हतं. अंग जड झाल्यासारखं, मन कुठेतरी हरवल्यासारखं, अगदी झोपून झोपून रहावंसं वाटत होतं. कामे तर रोजचीच होती पण आज ती खूपच अवघड अन् नकोशी वाटत होती.
“तू एवढी आळशी कधीपासून झालीस?” कुणीतरी कालच तिला हसत म्हणालं होतं. सीद्धीनेही ते हसून टाळलं. पण मनात मात्र प्रश्न घर करून बसलेलं... “खरंच मी आळशी झाले आहे... की माझं शरीर काहीतरी सांगतंय?”
ही गोष्ट फक्त सीद्धीची नाही. अनेक महिलांच्या आयुष्यात “आळस” म्हणून दुर्लक्षित होणारी ही भावना प्रत्यक्षात शरीराचा एक महत्त्वाचा इशारा असू शकते. सततचा थकवा, कामात रस न वाटणे, अंगात ऊर्जा नसल्यासारखं वाटणं हे केवळ कामचुकारपणाचं लक्षण नसून, शरीर आणि मनाच्या थकव्याची एकत्रित अभिव्यक्ती असू शकते.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांवर दुहेरी जबाबदारी असते घर आणि करिअर. सकाळपासून रात्रीपर्यंत चालणाऱ्या या धावपळीत स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. परिणामी, शरीर हळूहळू थकायला लागतं आणि हा थकवा सर्रासपणे “आळस” म्हणून गृहीत धरला जातो.
यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे अपूर्ण आणि असंतुलित आहार. अनेक महिला घरातील सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःच्या जेवणाकडे दुर्लक्ष करतात. नाश्ता टाळणे, वेळेवर न खाणे, जंक फूडवर अवलंबून राहणे यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. विशेषतः लोह (आयर्न), व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसतात. रक्ताल्पता (अॅनिमिया) ही महिलांमध्ये फार सामान्य समस्या असून, तीही सततच्या थकव्याचं एक मोठं कारण आहे.
तसंच, महिलांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर होणारे हार्मोनल बदलही ऊर्जा पातळीवर परिणाम करतात. मासिक पाळीपूर्व काळ (पीएमएस), गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्ती या सर्व टप्प्यांमध्ये शरीरात मोठे बदल होत असतात. या काळात थकवा, चिडचिड, भावनिक अस्थिरता आणि आळस जाणवणं सामान्य असलं, तरी ते दुर्लक्षित करणे योग्य नाही.
शारीरिक कारणांइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. सततचा ताण, चिंता, जबाबदाऱ्यांचं ओझे आणि स्वतःसाठी वेळ न मिळणे यामुळे मन थकून जातं. हा मानसिक थकवा अनेकदा शरीराच्या थकव्याच्या रूपात दिसून येतो. तसेच “काहीच करायची इच्छा नाही” ही भावना अनेकदा डिप्रेशनची सुरुवातही असू शकते.
झोपेची कमतरता हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. आधुनिक जीवनशैलीत उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, अपुरी आणि खंडित झोप यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती मिळत नाही. परिणामी, दुसऱ्या दिवशी उठल्यावरही थकवा जाणवतो आणि दिवसभर आळस वाटत राहतो.
काही वेळा हा सततचा आळस एखाद्या आजाराचा संकेतही असू शकतो. जसं की थायरॉईड समस्या, अॅनिमिया, किंवा डिप्रेशन. त्यामुळे हा थकवा काही दिवसांपुरता मर्यादित न राहता सतत जाणवत असेल, तर वैद्यकीय सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
मग यावर उपाय काय?
उपाय मोठे किंवा कठीण असण्याची गरज नाही. लहान पण सातत्यपूर्ण बदल ही स्थिती बदलण्यास पुरेसे असतात. सर्वप्रथम, संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळं, डाळी, दूध, अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ समाविष्ट करा. पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा.
दुसरं म्हणजे नियमित व्यायाम. रोज किमान ३० मिनिटं चालणं, योगा किंवा स्ट्रेचिंग केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, एंडॉर्फिन्स तयार होतात आणि ऊर्जा वाढते. सुरुवातीला जरी जड वाटलं, तरी हाच व्यायाम थकवा कमी करण्यात मदत करतो.
दिवसभराच्या थकव्यावर मात करण्यासाठी “मायक्रो-ब्रेक्स” खूप उपयुक्त ठरतात. दर १-२ तासांनी फक्त २-३ मिनिटं थांबून मान, खांदे आणि पाठीसाठी हलके स्ट्रेचिंग करा, जसं की मान हळूवारपणे उजवी-डावी वाकवणे, खांदे पुढे-मागे फिरवणे आणि हात वर उचलून शरीर ताणणे. या छोट्या हालचालींमुळे स्नायूंमधील ताण कमी होतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराला ताजेपणा मिळतो.
तिसरं, स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. दिवसातील थोडा वेळ वाचन, ध्यान, संगीत किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी ठेवा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मन ताजेतवाने राहते.
चौथं, झोपेची शिस्त पाळा. दररोज ठराविक वेळी झोपणे-उठणे, झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळणे या सवयी अंगी आणा. चांगली झोप ही शरीराची नैसर्गिक ऊर्जा पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःशी संवाद साधा.
स्वतःला “आळशी” म्हणून दोष देण्यापेक्षा, थांबून स्वतःला विचारा, “माझं शरीर काय सांगतंय?”
कारण प्रत्येक वेळी आळस म्हणजे कामचुकारपणा नसतो. कधी कधी तो आपल्या शरीराचा शांतपणे दिलेला इशारा असतो.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही केवळ गरज नाही, तर जबाबदारी आहे. कारण घर, कुटुंब आणि समाज यांची उभारणी करणारी स्त्रीच जर थकलेली असेल, तर त्या सगळ्याचं संतुलन बिघडू शकतं. म्हणूनच, महिलांनो स्वतःची काळजी घ्या, कारण तुमचं आरोग्यच तुमची खरी ताकद आहे.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर