प्रेमळ भेट

महेश आज तिच्या आयुष्यात फक्त मित्र म्हणून आहे. हे नातं काळानुसार बदललेलं आहे. पण त्याने दिलेली ती पहिली भेटवस्तू.. ती डायरी... तिच्या आयुष्यात कायमची कोरली गेली आहे.

Story: पहिलं वहीलं |
24th April, 09:24 pm
प्रेमळ भेट

आ​जही तो दिवस अगदी खास आहे. जणू काही सगळं स्वप्नात बघितलं तसंच घडणार, असं शुभदाला उठल्यापासून वाटतंय. पहाटेची स्वप्नं खरी होतात, असं तिला वाटायचं. पण आजचं स्वप्न म्हणजे आपल्या मनात असलेल्या भावना आणि इच्छाच स्वप्नात दिसल्या, असं ती स्वतःलाच पटवून देते. कारण महेश आणि भेटवस्तू आणणार, तेही माझ्यासाठी? आज तीन वर्षे झाली त्याच्याशी ओळख होऊन. वाढदिवस असो किंवा काही खास दिवस... एकदाही कधी साधं चॉकलेट सुद्धा न देणाऱ्या महेशने आज स्वप्नात माझ्या उपयोगी पडेल अशी वस्तू भेट म्हणून दिली आहे आणि "तुझी आवड बघून आणली" असंही तो म्हणाला...

​शुभदा हे सगळं स्वप्न समजून कॉलेजला जायची तयारी करू लागली. पटपट आवरून ती "आई येते गं, बस चुकेल" असं म्हणून आईच्या "हो बरं" असं काही उत्तर यायच्या आधीच निघाली सुद्धा. बस स्टॉपकडे पोहोचेपर्यंतच्या दहा मिनिटांच्या वाटेत ती पूर्णपणे 'महेशमय' झाली होती.

​सकाळची वेळ होती. हवेत हलकासा गारवा होता आणि मनात मात्र एक वेगळाच विचार सुरू होता. महेश आज भेटणार आहे, हे माहीत असल्यामुळे शुभदाचं मन सारखं भरकटत होतं. तिची नजर अभ्यासाच्या वहीत असली, तरी अक्षरं काही वाचली जात नव्हती. प्रत्येक पानावर तिच्या मनात फक्त एकच नाव होतं... महेश.

​कॉलेजच्या आवारात आज सगळं काही वेगळंच वाटत होतं. झाडांची सळसळ, मित्रमैत्रिणींची गडबड, वर्गातली कुजबुज... सगळंच परिचित असूनही आज नवीन भासत होतं. कारण आज शुभदाच्या आयुष्यात काहीतरी खास घडणार आहे, अशी तिच्या मनाला हलकीशी चाहूल लागली होती.

​एवढ्यात ती महेशला येताना बघते. महेश तिला नेहमीसारखाच साधा आणि हसरा दिसतो. पण आज त्याच्या डोळ्यांत थोडासा बुजरेपणा, बावरलेपणा आणि काहीतरी वेगळं जाणवत होतं. शुभदा त्याच्याकडे पाहते आणि लगेच नजर वळवते. दोघांच्याही नजरा जणू एकमेकांशी काही न बोलताही खूप काही बोलून जातात.

​“शुभदा, लेक्चर संपल्यावर थोडं थांबशील?” महेश हलक्या आवाजात विचारतो.

ती थोडी दचकल्यासारखी होते, पण होकारार्थी मान हलवते. वर्ग सुटल्यावर दोघंही कॉलेजच्या मागच्या बागेत येतात. तिथे नेहमीसारखीच शांतता होती, पण आज ती शांतता त्यांना आवडत होती. त्या शांततेत एक गोड उत्सुकता आहे, असं त्यांना वाटतं.

​महेश काही क्षण गप्प राहतो. बोलू की नको, असं काहीसं त्याच्या मनात चाललेलं असतं. तो हातात काहीतरी धरून आहे, हे शुभदाच्या लक्षात येतं. तिच्या मनाची धडधड आता वाढू लागते. “काय असेल?” हा प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा येतो.

​“हे... तुझ्यासाठी,” महेश शेवटी म्हणतो.

तो एक छोटासा गिफ्ट बॉक्स तिच्यासमोर धरतो. अगदी साधं, रंगीत कागदात गुंडाळलेलं. पण त्या छोट्या बॉक्समध्ये काहीतरी स्पेशल आहे, हे शुभदाला जाणवतं.

ती थोडी संकोचते. “माझ्यासाठी?” ती हलक्या आवाजात विचारते.

“हो... काही खास नाही... पण मला वाटलं तुला आवडेल,” महेश म्हणतो.

​त्या क्षणी शुभदाला काय बोलावं ते सुचत नाही. ती हळूच ते गिफ्ट हातात घेते. तिच्या हाताला त्याचा स्पर्श जाणवतो आणि तिच्या मनात प्रेमाची लहर उमटू लागते. ती हळूच गिफ्ट उघडते.

​आत एक सुंदर, छोटीशी डायरी असते. साधीच, पण खूप सुंदर. कव्हरवर नाजूक फुलांची डिझाईन आणि आत पहिल्या पानावर महेशने लिहिलेलं असतं,

“तुझ्या प्रत्येक विचाराला एक जागा मिळावी म्हणून...”

​त्या एका वाक्याने शुभदाच्या डोळ्यांत नकळत पाणी येतं. इतकं साधं, पण थेट मनाला भिडणारं. ती त्या डायरीकडे पुन्हा पुन्हा पाहते.

​“आवडलं का गिफ्ट?” महेश थोड्या संकोचाने विचारतो.

शुभदा काही क्षण बोलू शकत नाही. ती फक्त मान हलवते. “खूप...” एवढंच तिच्या तोंडून निघतं.

​त्या क्षणाला शब्दांची गरजच नसते. त्या छोट्याशा भेटवस्तूमधून महेशने तिच्यासाठी खूप काही सांगितलेलं असतं. तिच्या विचारांची कदर, तिच्या अस्तित्वाचं महत्त्व आणि न बोलताही व्यक्त झालेलं एक नातं.

​त्या दिवसानंतर ती डायरी शुभदाच्या आयुष्याचा भाग बनते. ती त्यात तिचे विचार लिहिते; तिचा आनंद, तिची भीती, तिची स्वप्नं... आणि प्रत्येक पानावर तिला महेशचा तोच पहिला स्पर्श जाणवत राहतो.

​महेश आज तिच्या आयुष्यात फक्त मित्र म्हणून आहे. हे नातं काळानुसार बदललेलं आहे. पण त्याने दिलेली ती पहिली भेटवस्तू.. ती डायरी... तिच्या आयुष्यात कायमची कोरली गेली आहे.

​कारण ती फक्त एक वस्तू नव्हती...

ती एक भावना होती.

एक सुरुवात होती.

एका नात्याची पहिली हलकीशी चाहूल होती.

आणि म्हणूनच, त्या छोट्याशा भेटवस्तूची किंमत शब्दांत मोजता येत नाही.


- मंजिरी वाटवे