आजच्या काळात नाती एवढी fragile का झालीत?

नाती काचेसारखी नाजूक नसतात... ती बागेसारखी असतात. दुर्लक्ष केलं तर कोमेजतात, काळजी घेतली तर फुलतात.

Story: मनी मानसी |
24th April, 09:27 pm
आजच्या काळात नाती एवढी fragile का झालीत?

पूर्वीच्या काळात नाती टिकायची, आजच्या काळात नाती टिकवावी लागतात. तसा हा फरक लहान वाटू शकतो, पण नात्यांच्या गुंतागुंतीत खरंतर तो फार मोठा होवून जातो!

एकेकाळी नात्यांसाठी आपल्याकडे वेळ होता, सहनशीलता होती, एकमेकांसाठी थांबण्याची सवय होती. परंतू आज नात्यांकडे ऑप्शन आहेत, प्रलोभने आहेत, आणि “जर नाही जमलं तर तोडून टाकू” अशी सहज परंतू घातक अशी मानसिकते निर्माण झाली आहे. म्हणूनच अनेकांना वाटतं, आजची नाती खूपच fragile झालीत बुवा! 

आता Fragile म्हणजे काय? तर नाजूक. पटकन दुखावणारी, पटकन तुटणारी, पटकन दूर जाणारी. अहो पण ही नाती काही अचानक fragile झाली नाहीत! माणसांच्या मनात काळानुरूप जे बदललं, त्याचंच प्रतिबिंब नात्यांत दिसू लागलं.

मानसविश्लेषणाच्या दृष्टीने पाहिलं तर प्रत्येक माणूस नात्यात फक्त स्वतःला घेऊन येत नाही, तो त्याचं बालपण, अपूर्ण गरजा, भीती, असुरक्षितता, जुने अनुभव, न मिळालेलं प्रेम हे सगळं घेऊन येतो. आता हे आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रेमी प्रेयसी ह्यांपैकी सगळ्या नात्यांना लागू पडते हो! म्हणजे दोन माणसं भेटतात, पण प्रत्यक्षात दोन इतिहास भेटत असतात. ज्याला बालपणी सतत नाकारलं गेलं, तो मोठेपणी partner चा उशिरा आलेला reply देखील rejection म्हणून घेतो. ज्याला लहानपणी खूप नियंत्रण सहन करावं लागलं, त्याला प्रेमात साधी चौकशीसुद्धा बंधन वाटू शकते. ज्याने घरात सतत भांडणं पाहिली, तो छोट्या मतभेदालाही नात्याचा शेवट समजू शकतो. त्यामुळे प्रश्न वर्तमानाचा नसतो, trigger वर्तमानात असतो, जखम भूतकाळात असते.

आज सोशल मिडीयानेही नात्यांना वेगळीच कसोटी दिली आहे. लोकांना आता वास्तवापेक्षा perception महत्त्वाचं वाटू लागलं आहे. फोटोमध्ये हसू असतं, पण मनात संवाद नसतो. “Seen” दिसतं, पण समजून घेणं दिसत नाही. तुलना इतकी वाढली आहे की स्वतःचं नातंही दुसऱ्यांच्या हायलाईट रीलशी मोजलं जातं.

नाती fragile होण्याचं आणखी एक कारण म्हणजे इमोशनल स्किल्सची कमतरता. प्रेम करायला सगळ्यांना येतं, पण मतभेद हाताळायला, माफी मागायला, boundaries समजायला, स्वतःच्या भावनांना नाव द्यायला फार थोड्यांना शिकवलं जातं.

मग उपाय काय?

१. प्रतिक्रिया देण्याआधी मूळ भावना ओळखा : 

राग येतोय? कदाचित आत दुखावलेपण आहे. मत्सर आहे? कदाचित भीती आहे. भावना ओळखली की भांडणाची तीव्रता कमी होते.

२. नात्यांत इतरांना शत्रू समजू नका : 

समस्या विरुद्ध तुम्ही दोघं अशी भूमिका घ्या. “तू विरुद्ध मी” नाही.

३. ट्रिगर डायरी ठेवा : 

जेव्हा भांडण होतं, तेव्हा विषय काय होता हेच नाही तर तुम्हाला नेमकं काय वाटलं हे सुध्दा लिहा. उदा. “त्याने फोन नाही केला” → “मला दुर्लक्षित वाटलं.” यामुळे तुम्हालाच तुमचे इमोशनल पॅटर्न समजायला सोपे जातील.

४. २४ तासांचा नियम :

रागात लगेच निर्णय घेऊ नका. ब्रेकअप, ब्लॉक, कटु शब्द, हे इम्पल्सिव्ह निर्णय असतात. २४ तास थांबा, मग बोला. 

५. आठवड्याचा इमोशनल चेक-इन, एकदा विचारा :

  •  या आठवड्यात तुला/ तुम्हाला काय चांगलं वाटलं?
  •  काही दुखावलं गेलं का?
  •  मी काही सुधारणा करू शकतो/शकते का?
  •  हा संवाद नात्याला प्रिव्हेन्टिव्ह केअर देतो.

६. लव्ह लँग्वेज ओळखा : 

कुणाला शब्द हवे असतात, कुणाला वेळ, कुणाला मदत, कुणाला स्पर्श, कुणाला thoughtful gestures.

तुम्ही तुमच्या भाषेत प्रेम देत असाल, पण समोरच्याला त्याच्या भाषेत ते  हवं असू शकतं.

७. प्रोजेक्शन पकडा : 

कधी आपण स्वतःची भीती दुसऱ्यावर लादतो. “तू मला सोडून जाशील” हे कधी कधी समोरच्याचं वर्तन नसतं, तर ती आपलीच आंतरिक भीती असते. अशावेळी स्वतःला नक्की विचारा, हे वास्तविकता आहे की माझीच एखादी जुनी जखम हे बोलतेय? 

८. मायक्रो-अॅप्रिसिएशन करा : 

मोठ्या अॅनिव्हर्सरी सरप्राइझपेक्षा रोजचं अॅप्रिसिएशन महत्त्वाचं. “धन्यवाद”, “आज तू थकलास तरी ऐवढं केलंस”, “तू आहेस म्हणून बरं वाटतं.” असे छोटे शब्द कितीतरी वेळा नाती तारून नेतात.

९. कॉन्फ्लिक्ट रूल्स ठरवा: 

  •  एकमेकांना नावं ठेवायचं नाही
  •  जुने मुद्दे ओढायचे नाहीत
  •  कॅरेक्टर अटॅक नाही
  •  मध्ये ब्रेक घेऊ शकतो
  •  असे का करावे? कारण, नियम नसलेले वाद परस्परांच्या नात्यांसाठी विनाशकारी ठरतात. 

नाती काचेसारखी नाजूक नसतात... ती बागेसारखी असतात. दुर्लक्ष केलं तर कोमेजतात, काळजी घेतली तर फुलतात. आणि जिथे अहंकारापेक्षा समजूतदारपणा, रागापेक्षा संवाद, आणि अपेक्षेपेक्षा स्वीकार जास्त असतो तिथे नातं तुटत नाही, तर ते अधिक खोल रुजतं हे नक्की!


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४