आयस्फुटच्या आठवणी मात्र आजही मनपटलावर संचित खजिना बनून ताज्यातवान्या आहेत. एप्रिल महिना सुरू झाला की या आठवणी मनाला स्पर्श करतात आणि मन त्या आठवणींत रमताना नकळत हर्षून जाते.

ग्रीष्माच्या तप्त उकाड्यातही मनाला गारवा आणि तजेला देणाऱ्या अनेक गोड आठवणी... अगदी ग्रीष्मातील गोड मानकुराद आंब्यासारख्या; मग त्या बालपणीच्या असोत किंवा कॉलेज जीवनातील. ग्रीष्म सुरू झाला की, त्या हळुवारपणे मनपटलावर नाचू लागतात. त्यातील एक गोड आणि आनंददायी आठवण म्हणजे 'आयसफ्रुट'ची आठवण! शालेय जीवनाच्या प्रारंभीपासून ते कॉलेजचा प्रवास संपेपर्यंत खाल्लेल्या गारेगार, गोड आयसफ्रुटच्या सुखद आठवणी आजही ताज्या आहेत. या आयसफ्रूटने माझे बालपण सुकर केले, असे म्हणायला हरकत नाही. खेड्यातील ते बालपण म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातील ते हिरवे दिवस, जे सोनेरी पंखांनी भुर्रकन उडून गेले.
मजा म्हणजे, एरवी आमच्या गावात अगदी नावालाही न मिळणारे आयसफ्रुट मार्च, एप्रिल, मे महिन्यात मात्र रोज भरपूर खायला मिळायचे; तेही शाळेच्या मधल्या सुट्टीच्या वेळी. मधल्या सुट्टीची बेल झाली की, आयसफ्रुटवाला शाळेच्या पटांगणाजवळ येऊन थांबायचा. तसे पाहायला गेल्यास, मी जेव्हा हायस्कूलमध्ये शिकत होते त्याकाळी आमच्या गावात एकच आयसफ्रुटवाला होता. त्याचे नाव 'गुरगुरो'. त्याचे खरे नाव दुसरे काही असेलही, पण अजूनतरी ते मला समजलेले नाही. असो, आम्ही त्याला 'गुरगुरो भाऊ' म्हणायचो. तो आमच्याच गावचा होता. एरवी तो शेती-भाटाच्या कामाला जायचा, पण मार्च महिना सुरू झाला की स्वतःचा स्वतंत्र असा उद्योग सुरू करायचा, एक लघुउद्योगच म्हणा ना! आयसफ्रुट आणि पेप्सी तयार करणे आणि डब्यात घालून गावभर सायकलवरून फिरून विकणे, हा त्याचा व्यवसाय. उकाड्याने हैराण झालेल्या गावातल्या पोरांना थंडावा बहाल करणे, हेच त्याचे काम.
शाळेची मधल्या सुट्टीची बेल वाजली की मुले "गुरगुरो भाऊ येयलो रे!" असे ओरडत त्याला गराडा घालायची. चार आण्याला साधे आयसफ्रुट मिळायचे. पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या रंगाचे गोड आयसफ्रुट! ते खाल्ल्यावर जिभेवर रंगाची निशाणी सोडून जायचे. ७५ पैशाला मात्र दुधाचे आयसफ्रुट मिळायचे, तेही छान वेस्टनात गुंडाळलेले असायचे. एका रुपयाला 'चॉकलेट आईस्क्रीम' म्हणजे चॉकलेटचे आवरण असलेले दुधाचे आयसफ्रुट मिळायचे. गुरगुरो भाऊचे शिक्षण जेमतेम होते, मात्र तो पक्का शिस्तीचा होता. तो मुलांना आयसफ्रुट घेण्यासाठी रांगेत शिस्तीत उभे करायचा. त्याने कधीच कोणाशी भांडण-तंटा केल्याचे मी तरी पाहिले नाही. कधी एखाद्या शिक्षकाला आयसफ्रुट खायची तलफ आली, तर तो त्यांना मानाने पहिले आयसफ्रुट द्यायचा.
प्रत्येक मुलाला वाटायचे की आपण एखादे तरी आयसफ्रुट खावे, कारण तो काळच तसा होता. वाड्यावरच्या प्रत्येक घरात एप्रिल-मे महिन्यात फणस, आंबे, केळी यांची रास असायची, पण 'आईस्क्रीम' नावाचा प्रकार त्याकाळी गावात विक्रीला नसायचा. एखादे मंगल कार्य, शुभ विवाह किंवा मुंज असेल, तरच शहरातून खास गाडी करून आईस्क्रीम मागवले जायचे. गाडीतून मंडपापर्यंत कप आईस्क्रीम यायचे आणि त्या दिवशी अख्खा गाव आईस्क्रीमवर ताव मारायचा. आजच्यासारखी पावलोपावली आईस्क्रीमची दुकाने तेव्हा नव्हती, त्यामुळे आम्हाला चार आण्याला शाळेच्या सुट्टीत मिळणारे ते आयसफ्रुट अमृततुल्य वाटायचे.
त्याशिवाय अजून एक थंडाईचा प्रकार गुरगुरो भाऊ आपल्या डब्यात आणायचा, तो म्हणजे 'पेप्सी'. लांबट प्लॅस्टिकच्या आवरणात असलेली ही रंगीत बर्फ पेप्सी! एका बाजूला लहानसे छिद्र पाडून तिचे गारेगार पाणी जिभेवर रेंगाळताना तहानलेल्या जीवाची रसना तृप्त व्हायची. गावातील मोजक्याच घरांमध्ये काही काळानंतर फ्रीज आले. शीतपेये काचेच्या बाटलीतून किराणा दुकानात जाऊन घ्यावी लागायची, तीही महागडी आणि त्या काळात खिशाला न परवडणारी. त्यामुळे उन्हाळ्यात आयसफ्रुट आणि पेप्सीच आपली वाटायची.
मार्च ते मे महिन्यात, अगदी शाळांना सुट्टी पडून पाऊस पडेपर्यंत बालगोपाळांना आणि थोरामोठ्यांना थंडावा देण्यासाठी गुरगुरो भाऊ वाड्यावाड्यांनी फिरायचा. मजेशीर गोष्ट म्हणजे एप्रिलमध्ये काजू बियांचा हंगाम असायचा. दहा काजू बियांना एक आयसफ्रुट, अशा दराने तो बियांच्या बदल्यात आयसफ्रुट विकायचा. काही मुले बिया देऊन आयसफ्रुट खाताना मी पाहिले होते. मलाही वाटले, उगीच कशाला पैसे द्यायचे? त्यापेक्षा घरातल्या काजू बिया देऊन आयसफ्रुट खाऊया. आणि हा प्रत्यक्ष प्रयोग मी केला सुद्धा! घरामागच्या अंगणात वाळत घातलेल्या काजू बिया चोरून एक-दोनदा गुपचूप आयसफ्रुट खाल्लेही. पण तिसऱ्या वेळी मात्र आजीने मला रंगेहात पकडले. आजीची माझ्यावर मोठी नात म्हणून जिवापाड माया होती, तरीही "बियो विकून आयसफ्रुट खाता, पावसान कितें माती खातले?" (बिया विकून आयसफ्रुट खाताय, पावसात काय माती खाणार का?) म्हणत तिने हातातील काठीने मला झोडपले. त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही कोणतीही वस्तू चोरायचे किंवा खोटे बोलायचे धाडस मला झाले नाही.
दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, शाळांना सुट्ट्या लागल्या आणि घरासमोरच्या रस्त्यावर मुले खेळू लागली की मला ही गोष्ट हमखास आठवते. आज काळ बदलला आहे. पावलोपावली आईस्क्रीमची दुकाने झाली आहेत, मग ते खेडे असो वा शहर. आपल्या गोमंतकात आता वेगवेगळ्या कंपन्यांची, चवींची आणि आकारांची आईस्क्रीम मिळतात. त्यामुळे कोणालाच आता या आयसफ्रुटमध्ये रस राहिलेला नाही. बदलत्या काळानुसार ते सायकलवरून गल्लीबोळात फिरणारे आयसफ्रुटवालेही लुप्त झाले आहेत. पण आयसफ्रुटच्या आठवणी मात्र आजही मनपटलावर संचित खजिना बनून ताज्यातवान्या आहेत. एप्रिल महिना सुरू झाला की या आठवणी मनाला स्पर्श करतात आणि मन त्या आठवणींत रमताना नकळत हर्षून जाते.

- सौ. शर्मिला प्रभू
मडगाव-गोवा