माहेरची ओढ

माहेरी येताना आपण दोन बॅगा घेऊन येतो, पण जाताना आईच्या मायेने भरलेल्या चार बॅगा सोबत असतात. 'आणखी चार दिवस राहता आले असते तर किती बरं झालं असतं' असं राहून राहून वाटत राहतं.

Story: ललित |
17th April, 08:22 pm
माहेरची ओढ

माहेरची ओढ कोणाला नसते? मग ती नवीन लग्न झालेली मुलगी असो किंवा अनेक वर्षे संसारात रमलेली गृहिणी. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या की आपल्याला वाटते, आपण आठ-पंधरा दिवस आईकडे राहून यावे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे राहण्याचा मुलांचा आनंद तर वेगळाच असतो. आजी-आजोबांचे लाड आणि मामा-मावशींनी पुरवलेले हट्ट यात मुले पार हरखून जातात. सासरी असताना ज्या गोष्टी आपण करू शकत नाही, त्या माहेरी अगदी मनमोकळेपणाने करतो. सकाळी जरा उशिरा उठणे, कारण तिथे पतीला डबा देण्याची घाई नसते. आई समोर नाश्ता हजर करते आणि आपल्या आवडीचे पदार्थ मायेने करून घालते.

जर तुमचे माहेर एखाद्या निसर्गरम्य गावात असेल, तर त्याची मजा काही औरच! माझे माहेर पेडणे तालुक्यातील धारगळ गावात आहे. आमच्याकडे काजू, माड, सुपारी आणि आंब्याच्या बागा आहेत. लहानपणी शाळेला सुट्टी पडली की आम्ही आजी आणि आत्यासोबत काजूच्या बागेत जायचो. तिथे काजू, जांभळे, जगमा, चुन्ना, कांट, चारोळी असा रानमेवा गोळा करून खाण्यात एक वेगळीच मजा असायची. संध्याकाळी कधीतरी आम्ही काजूबिया भाजून खायचो, तर उरलेल्या काजूबिया आत्या आठवडी बाजारात नेऊन विकायची.

पावसाळा जवळ आला की माडाच्या बागेची साफसफाई व्हायची. काका आम्हाला झाडावरून शहाळी काढून द्यायचे. त्यावेळी आमच्याकडे पाण्याचा पंप नव्हता, त्यामुळे आम्ही विहिरीचे पाणी काढून सुपारीच्या झाडांना पाणी द्यायचो. आजी आम्हाला शेजारच्या काकूंच्या बागेत 'रिटीची' (रिठा) फळे वेचायला न्यायची. रिठा हातावर घासल्यावर जो साबणासारखा फेस यायचा, ती एक मोठी गंमत होती. आमच्याकडे कोकमाचीही दोन झाडे होती, कोकम फोडताना खूप मजा यायची.

आजीला उन्हाळ्यात समुद्राच्या खऱ्या पाण्यात अंघोळ करण्याची सवय होती, त्यामुळे एखादा रविवार तिच्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर मजेत जायचा. इतर रविवार कामांत कसे उडायचे ते कळायचेही नाही; कधी आंबे उतरवण्यात, कधी खोप (झोपडी) शिवण्यात, कधी घराची कौले शाकारण्यात, तर कधी गुरांचा गोठा नीट करण्यात पूर्ण दिवस जायचा.

जसजसे आम्ही मोठे झालो, तशी गावात आणि घरात खूप सुधारणा झाली. आता सगळी भावंडे नोकरीनिमित्त बाहेर असतात, तरीही वर्षातून एकदा आम्ही काजूच्या बागेत नक्की जातो. आंबे, फणस आणि रानमेवा आजही न चुकता घरी पाठवला जातो.

आईसोबतच्या त्या निवांत गप्पा आणि भावंडांसोबत घालवलेला वेळ इतक्या लवकर संपतो की पंधरा दिवस कसे निघून जातात, ते समजतही नाही. माहेरी येताना आपण दोन बॅगा घेऊन येतो, पण जाताना आईच्या मायेने भरलेल्या चार बॅगा सोबत असतात. 'आणखी चार दिवस राहता आले असते तर किती बरं झालं असतं' असं राहून राहून वाटत राहतं. जेव्हा पती न्यायला येतात आणि सगळ्यांचा निरोप घेण्याची वेळ येते, तेव्हा मात्र डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.

ओढ माहेरची...

माया माझ्या आईची!

आजीने शिवलेल्या गोधडीची,

तिच्याकडून ऐकलेल्या गोष्टींची.

मजा फिरण्यात काजू बागेत,

काय उरले आहे या शहरात?

आईच्या हातचे माशाचे कालवण,

शेजवान पिझ्झाची कुठे येते आठवण!

मजा पोहण्यात त्या नदीत,

ती सर नाही 'स्विमिंग पूल'मध्ये.

ओढ मला माझ्या माहेरची,

माझ्या आजोबांच्या गुरांची.

त्यांच्या पाठीवर लहानपणी बसायची,

घाबरून कधी कधी रडायची.

ओढ मला माहेरची,

माझ्या मस्तीखोर भावंडांची!


- निकिता कांदोळकर

कांदोळी, बार्देश - गोवा