आज योगेश दुसरीत जाणार आहे. मी त्याच्यासोबत जमेल तसा, शक्य तितका आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहे. आता माझ्यासमोर एकच ध्येय आहे. माझ्या योगेशला चांगले शिक्षण देऊन, त्याला मोठे करून, आयुष्यात सक्षम उभे करायचे.

मी सुबोध... सुबोध दास. मूळचा ओडिशाचा रहिवासी; पण उदरनिर्वाहासाठी गोव्यात आलो आणि इथेच स्थायिक झालो. गोव्यातील एका फार्मास्युटिकल कंपनीत मला नोकरी मिळाली. तिथेच शीला नावाच्या एका सहकाऱ्याशी माझी ओळख झाली. रोजच्या सहवासातून वाढत गेलेली ओळख हळूहळू प्रेमात बदलली. शीला गोव्याची होती. तिच्या घरच्यांना सुरुवातीला आमच्या नात्याला विरोध होता; पण आमच्या प्रेमाची प्रामाणिकता पाहून त्यांनी अखेर होकार दिला. छोट्याशा कौटुंबिक वातावरणात १५ मार्च २०१७ रोजी आमचे लग्न झाले.
लग्नानंतर आमचा संसार अगदी आनंदाने फुलू लागला. शीला तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे आम्ही तिच्याच बंगल्यात राहत होतो. सकाळी दोघेही कामावर जायचो, संध्याकाळी घरी परतल्यावर आई-बाबांबरोबर गप्पा, एकत्र जेवण, छोट्या छोट्या आनंदांत दिवस कसे निघून जायचे ते कळतही नसे. घरात आपुलकी होती, आधार होता, आणि उद्याची गोड स्वप्नेही होती.
काही महिन्यांतच आमच्या आयुष्यात आनंदाची आणखी एक चाहूल लागली. आमच्या घरी बाळ येणार होते. त्या नऊ महिन्यांत आई-बाबा आणि मी शीलाला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. योग्य वेळी आमच्या सुपुत्राचा जन्म झाला. आम्ही त्याचे नाव प्रेमाने योगेश असे ठेवले. त्याचे बारसेही आनंदात आणि थाटामाटात पार पडले. योगेशचे बोबडे बोल, त्याचे दुडूदुडू चालणे, त्याच्या निरागस हसण्याने आमच्या घराला खरे घरपण लाभले होते.
योगेश एक वर्षाचा झाला आणि आयुष्याने पुन्हा एकदा गोड बातमी दिली. शीला पुन्हा गरोदर होती. एवढ्या लवकर दुसऱ्या बाळासाठी आमची पूर्ण मानसिक तयारी नसली, तरी ती देवाची देणगी समजून आम्ही आनंदाने पुढे चालत राहिलो. शीलाची काळजी घेणे, योगेशचा सांभाळ करणे, नोकरी सांभाळणे हे सगळे करताना थकवा जाणवत नव्हता; कारण आमच्या पाठीशी आई-बाबांचा भक्कम आधार होता.
पण २०२० साल उजाडले आणि कोरोना नावाचे महाभयंकर संकट जगावर कोसळले. त्याच संकटाने आमच्या संसाराचाही पाया हादरवला. आमचे आधारस्तंभ असलेले आई-बाबा एकामागून एक आम्हाला कायमचे सोडून गेले. त्या दुःखातून सावरतही नाही तोवर आणखी एक आघात झाला. त्या वेळी शीला सात महिन्यांची गरोदर होती. एक दिवस तिलाही ताप आला. आम्ही दोघे मिळून योगेशला सांभाळत होतो; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अचानक शीलाही मला आणि योगेशला सोडून कायमची निघून गेली.
त्या क्षणी माझ्यावर जणू आभाळ कोसळले. एका क्षणात माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले. काय करावे, कुणाकडे जावे, कसे जगावे… काहीच सुचत नव्हते. मनाने मी पूर्ण खचून गेलो होतो. एक वेळ अशी आली की, योगेशला घेऊन मी अक्षरशः दारोदार फिरलो. केविलवाण्या आवाजात लोकांना विचारू लागलो, “कोणी घेता का माझ्या मुलाला दत्तक?”
हे शब्दं उच्चारताना माझ्या काळजाचे तुकडे होत होते. देवा, अशी वेळ कुठल्याही बापावर येऊ नये! स्वतःच्या पोटच्या लेकराला दुसऱ्यांच्या स्वाधीन करण्याचा विचारही किती भयानक असतो, हे त्या वेळी मला उमगले. ज्या बंगल्यात कधी हसू, प्रेम आणि माणुसकी नांदत होती, तोच बंगला आता मला रिकामा, भयानक आणि खायला उठल्यासारखा वाटत होता.
अशा वेळी एका मित्राने मला आधार दिला. त्याने सुचवले, “योगेशच्या सांभाळासाठी पूर्ण वेळ एखादी बाई ठेव.” मग मला एक बाई मिळाली. ती दिवसभर योगेशचा सांभाळ करू लागली आणि मी पुन्हा कामावर जाऊ लागलो. आयुष्याचे चाक पुन्हा हळूहळू फिरू लागले; पण मनातील वेदना तशाच होत्या.
योगेश शाळेत जायच्या वयाचा झाला, तेव्हा मी त्याला जवळच्या शाळेत प्रवेश घेतला. पण तिथेही त्याची अवस्था पाहिली की मन भरून यायचे. तो इतर मुलांकडे पाहून निरागसपणे विचारायचा, “सर्वांची मम्मी येते, माझीच का नाही?”
त्या एका प्रश्नाने माझ्या हृदयाला पिळ पडायचा. त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. शब्द ओठांवर यायचे, पण घशातच अडकून पडायचे.
या सगळ्यात एक-दोनदा मनात दुसऱ्या लग्नाचाही विचार आला. पण लगेच मनातील दुसरा आवाज म्हणायचा, ‘जर तिने योगेशचा सांभाळ त्याच्या आईसारखा केला नाही तर?’ हा विचार मनात आला की मी पुन्हा मागे हटायचो. शेवटी मी तो विचार कायमचा सोडून दिला.
आज योगेश दुसरीत जाणार आहे. मी त्याच्यासोबत जमेल तसा, शक्य तितका आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहे. आता माझ्यासमोर एकच ध्येय आहे. माझ्या योगेशला चांगले शिक्षण देऊन, त्याला मोठे करून, आयुष्यात सक्षम उभे करायचे.
आयुष्य आपल्याला कधी कधी अशी वळणे दाखवते, जी आपण कधी स्वप्नातही पाहिलेली नसतात. काही गोष्टी आपल्या हातात नसतात; पण त्यांच्यासमोर हार मानून रडत बसण्यात अर्थ नसतो. समोर येणाऱ्या प्रत्येक वेदनेला, प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात पुढे चालत राहणे, हाच जगण्याचा खरा मार्ग आहे. आज मी तेच करत आहे. माझ्या वेदनांना सोबत घेऊन, माझ्या मुलासाठी पुन्हा जगायला शिकत आहे.

- सौ गौरी रोशन वेर्लेकर