आमठाणे धरणाजवळ पोहोचल्यावर जणू एखाद्या शांत निसर्गमंदिरात आल्यासारखे वाटले. धरणाचे स्थिर पाणी आकाशाचे प्रतिबिंब दाखवत होते आणि सभोवतालचे वातावरण अतिशय प्रसन्न होते.

गोव्याच्या शांत आणि निसर्गरम्य अंतर्भागात वसलेले आमठाणे धरण हे ठिकाण अजूनही पर्यटकांच्या गजबजाटापासून दूर आहे. या सुंदर ठिकाणी दिलेली माझी भेट ही केवळ एक सहल नव्हती, तर गोव्याच्या ग्रामीण जीवनशैलीचा, परंपरांचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची अनुभूती देणारी एक समृद्ध सफर होती.
या प्रवासाची सुरुवातच खास होती. आम्ही बाइकने जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे निसर्गाशी अधिक जवळीक साधता आली. कोलवाळ येथून आम्ही रेवोडा आणि पिर्ण मार्गे पुढे निघालो. माझ्या नातेवाईकांसोबत हा प्रवास अधिकच खास ठरला, कारण त्यांचे माहेर या भागात आहे. रस्त्यात अरुंद गावे, लाल मातीचे रस्ते, माड आणि काजूची झाडे, तसेच पारंपरिक गोमंतकीय घरे दिसत होती. थंड वारा, मातीचा सुगंध आणि शांत वातावरण यामुळे प्रवास अत्यंत आनंददायी झाला.
जसजसे आम्ही आतल्या भागात पोहोचलो, तसतसा निसर्ग अधिकच खुलत गेला. हिरव्या डोंगररांगा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांतता, सगळेच मनाला सुखावणारे होते. अमठाणे धरणाजवळ पोहोचल्यावर जणू एखाद्या शांत निसर्गमंदिरात आल्यासारखे वाटले. धरणाचे स्थिर पाणी आकाशाचे प्रतिबिंब दाखवत होते आणि सभोवतालचे वातावरण अतिशय प्रसन्न होते.
धरणाजवळ एक विशेष दृश्य दिसले. मोठ्या प्रमाणात चरणाऱ्या शेळ्या आणि त्यांच्या हालचालींनी त्या परिसरात एक वेगळाच जीवंतपणा निर्माण केला होता. त्यांच्यासोबत धनगर समाजातील मेंढपाळही दिसले. धनगर हे पारंपरिक पशुपालक, त्यांच्या कळपाची काळजी घेत होते. झाडाखाली विश्रांती घेत, शांतपणे आपल्या जनावरांना मार्गदर्शन करताना त्यांना पाहणे हा एक सुंदर आणि अर्थपूर्ण अनुभव होता. त्यांच्या जीवनशैलीत निसर्गाशी असलेली जवळीक स्पष्टपणे जाणवत होती.
या सहलीचा आणखी एक खास भाग म्हणजे काजू बागेत घालवलेला वेळ. जमिनीवर पडलेली लाल, पिवळी काजू फळे गोळा करताना खूप आनंद मिळाला. काजू फळांचा खमंग सुगंध आणि रंग, वातावरणात एक वेगळीच उर्जा निर्माण करत होते. वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून "Anacardium occidentale" या वनस्पतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे हा माझ्यासाठी विशेष अनुभव होता.
यानंतर आम्हाला निरो पिण्याची संधी मिळाली. नारळाच्या फुलांपासून काढलेला हा ताजा रस सकाळीच गोळा केला जातो. गोडसर, थंड आणि ताजेतवाने असा हा पेय अनुभव खूपच आनंददायी होता. नारळाच्या झाडाखाली बसून हा निरो पिणे, स्थानिक लोकांशी गप्पा मारणे हे क्षण खूपच संस्मरणीय ठरले.
या सहलीतून गोव्याच्या ग्रामीण जीवनाची झलकही पाहायला मिळाली. काजू संकलन, नारळाच्या झाडांवरून रस काढणे, पशुपालन, हे सर्व केवळ उपजीविकेचे साधन नसून स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. या परंपरा जपणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीवही या अनुभवातून झाली.
संध्याकाळी आम्ही काही वेळ धरणाजवळ शांत बसून निसर्गाचा आस्वाद घेतला. परतताना शेळ्यांचे कळप हळूहळू परत जात होते, सूर्यास्ताची सोनेरी किरणे पाण्यावर पडत होती, आणि मनात एक विलक्षण शांतता निर्माण झाली होती.
कोळवाळ, रेवोडा आणि पिर्ण मार्गे परतीचा प्रवासही तितकाच आनंददायी होता. ही सहल केवळ प्रवास नव्हती, तर निसर्ग, संस्कृती आणि आपुलकी यांचा सुंदर संगम होती. अमठाणे धरणाने मला पुन्हा एकदा साधेपणातल्या सौंदर्याची जाणीव करून दिली.

- डॉ. सुजाता दाबोळकर