आज एखाद्या व्यक्तीला मेसेज करा, पण “काय चाललंय?” एवढंच विचारू नका. थोडा वेळ काढा, फोन करा, किंवा भेटा...आणि मनापासून विचारा, “तू खरंच कसा/कशी आहेस?”

कालच एका क्लायंटने मला सांगितलं, “डाॅक्टर, माझ्याकडे लोकांची कमतरता नाही... पण ह्या सगळ्यात ‘माझं’ असं कोणीच नाही.”
हे वाक्य ऐकल्यावर काही क्षण मीही शांत झाले. कारण हा प्रश्न आजच्या काळात फारच सर्वसामान्य झाला आहे, आपण सतत लोकांमध्ये असतो, पण मन मात्र रिकामंच राहतं.
आज आपण ‘कनेक्टेड’ आहोत, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, कॉल्स, व्हिडिओ चॅट्स... पण मुख्य ‘कनेक्शन’ हरवलंय.
जणू आपण सगळे एका मोठ्या मेळाव्यात उभे आहोत खरे, पण प्रत्येकाच्या हातात अदृश्य काच आहे ज्यातून आपण इतरांना पाहतो, परंतू स्पर्श करू शकत नाही.
माझ्या समुपदेशनाच्या अनुभवात एक गोष्ट वारंवार दिसते, एकटेपणा हा लोकांच्या अभावामुळे नाही, तर ‘भावनिक संवादाच्या’ अभावामुळे निर्माण होतो.
आपण दिवसभर “हाय-हॅलो” करतो, मीम्स शेअर करतो, स्टेटसला रिप्लाय देतो...पण “तू खरोखर कसा/कशी आहेस?” हा प्रश्न विचारायला आपण विसरलो आहोत.
एकदा एका कॉलेज मुलीने मला सांगितलं, “माझ्या २,००० फॉलोअर्स आहेत, पण माझं दुःख सांगायला एकही व्यक्ती नाही.”
हे ऐकताना मला हसूही आलं आणि थोडंसं दुःखही. कारण आपण ‘लाईक्स’ मोजायला शिकलो, पण ‘लाइफ’ शेअर करायला विसरलो.
मानसशास्त्राच्या भाषेत याला Perceived Social Isolation म्हणतात जिथे व्यक्तीला वाटतं की ते एकटे आहेत, जरी प्रत्यक्षात त्यांच्या आजूबाजूला लोक असले तरी. हे फक्त सामाजिक नाही, तर भावनिक अंतर आहे. जणू आपण एका खोलीत बसलो आहोत, पण प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये हरवलेला... आणि त्या शांततेत एकटेपणा हळूहळू वाढत जातो.
पण प्रश्न असा आहे, हे असं का होतं?
एक कारण म्हणजे आपण ‘प्रेझेंटेशन’ मध्ये अडकलो आहोत.
आपण आपलं आयुष्य दाखवतो पण जगत नाही. आपण फिल्टर लावून फोटो पोस्ट करतो, पण आपल्या भावनांना मात्र ‘अनफिल्टर्ड’ ठेवायला घाबरतो.
कारण आत कुठेतरी भीती असते, “मी खरं सांगितलं तर लोक मला स्वीकारतील का?”
दुसरं कारण म्हणजे आपण ‘वेळ’ देणं बंद केलंय.
नात्यांना वेळ लागतो, लक्ष लागतं, संयम लागतो.
पण आज आपण ‘इंस्टंट’ सवयीचे झालो आहोत, इंस्टंट मेसेज, इंस्टंट रिप्लाय, इंस्टंट रिलेशनशिप...
आणि जेव्हा नातं थोडं कठीण होतं, तेव्हा आपण ‘स्किप’ करतो जणू काही ती युट्यूब अॅड आहे!
एकदा एक विवाहित जोडपं माझ्याकडे आलं होतं. दोघंही एकाच घरात राहत होते, पण संवाद शून्य.
मी विचारलं, “तुम्ही शेवटचं एकमेकांशी मनापासून कधी बोललात?” दोघंही शांत...
आणि त्या शांततेतच त्यांचं उत्तर होतं. म्हणूनच, एकटेपणावर उपाय ‘जास्त लोक’ नसून ‘खरे लोक’ आहेत. जे आपल्याला ऐकतील, समजून घेतील, आणि कधी कधी फक्त शांतपणे सोबत बसतील.
माझ्या अनुभवातून मी एक छोटी गोष्ट सांगते, एकदा मी एका वृद्ध महिलेला विचारलं, “तुम्हाला एकटेपणा वाटतो का?” त्या हसल्या आणि म्हणाल्या, “नाही गं, माझ्याकडे माझं मन आहे... आणि दोन-तीन माणसं आहेत जी मला खरंच ओळखतात. ते पुरेसं आहे.”
हे ऐकून मला जाणवलं, आपण ‘क्वांटिटी’ च्या मागे धावत आहोत, पण ‘क्वालिटी’ विसरलो आहोत.
म्हणूनच आज मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छिते..आज एखाद्या व्यक्तीला मेसेज करा, पण “काय चाललंय?” एवढंच विचारू नका.
थोडा वेळ काढा, फोन करा, किंवा भेटा... आणि मनापासून विचारा, “तू खरंच कसा/कशी आहेस?”
कारण कधी कधी, गर्दीतला एकटेपणा कमी करण्यासाठी एक प्रामाणिक संवाद पुरेसा असतो.
आणि हो...
जर कधी तुम्हालाही असं वाटलं की “मी लोकांमध्ये असूनही एकटी आहे”...
तर स्वतःशीही थोडं बोला.
कारण सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं नातं, ते आपलं स्वतःशी असलेलं नातं आहे.

- मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४