कोकणातील एका गजबजलेल्या घराच्या ओसरीवर रंगणाऱ्या गप्पा आणि तिथल्या फणसासारख्या वरून काटेरी पण आतून गोड असलेल्या 'इरसाल' माणसांच्या खुसखुशीत आठवणींचा जिवंत आणि रंजक प्रवास घडवणारा लेख.

आमच्या कोकणातल्या घराशी अनेक घटना, गोष्टी निगडित आहेत. मग त्या गावगाड्या संदर्भात असो, तंटा-बखेडा असो, देवाधर्माच्या असो. जवळ जवळ सगळ्याच गोष्टींचा उहापोह, चर्चा, निर्णय हे आमच्याच घरात घेतले जात. म्हणायला तसे पंचायत कार्यालय होते गावात, पण म्हणतात ना एकदा रूढी पडली की मग तेच चालू राहते, तश्यातला प्रकार! त्यात आमचे चुलत सासरेच सरपंच, त्यामुळे बघायलाच नको.
आमचे सासरे पक्के माणूसप्रेमी. त्यांना घर कसे गजबजलेले लागायचे. गावातले सर्व गावकरी, मग त्यात जात-धर्म आडवा येत नसे, सतत काही ना काही कारणाने घराकडे येत असत. त्यात आम्ही पोहोचलो की अजून रंग येत असे गप्पांना. जणू झारापचा तिठा आणि मुंबईची चौपाटी एकत्र भेटत असत शिळोप्याच्या गप्पा मारायला. असो!
गावात तसे इरसाल वीरही कमी नव्हते. एकेकाच्या कथाच वेगळ्या. तशी माणसे देवभोळी हो पक्की, पण शेवटी म्हणतात ना कोकणी तिरकसपणा, असो! आम्ही गेलो की रोज संध्याकाळी अड्डा जमायचा ओसरीवर. किराणा व्यापारी दत्तू शेट, येशा खानोलकरपासून मामू खाटकापर्यंत सगळे हजेरी लावत. गप्पांबरोबर तोंडी लावायला पान-सुपारी असायचीच फुकटची.
आमच्या दत्तू शेटचे तिठ्यावर्च छोटेसे दुकान डाळ, तांदूळ वगैरे विकण्याचे. कमाई किती माहीत नाही, पण गावच्या प्रत्येकाच्या येण्या-जाण्यावर मात्र कायम लक्ष त्यांचे. सगळे गावकरी त्यांना 'बहिर्जी नाईक' म्हणत. दुकानासमोरच एस. टी. स्टँड, त्यामुळे गावात कोण आला-गेला सगळी बातमी खडानखडा अगदी. नदीजवळच्या शांबा बांदलची लेक आज शाळेत जाताना दप्तराऐवजी जड पिशवी घेऊन सावंतवाडीला गेली, ही बातमी बस नेमळ्याला पोहोचायच्या आधीच बांदलला कळली. शाबा आणि त्याचा पोरगा मोटरसायकल घेऊन निघाले वाडीला, तेव्हा स्टँडवरच पोर सापडली. लपून लग्न करणार होती म्हणे. परत आल्यावर दत्तू शेटच्या पाया पडला बांदल. पण नंतर गावात ही गोष्ट पसरल्यानंतर दत्तू शेटला त्याच्या दुकानात शिव्याही दिल्या बांदलने!
असाच आमचा अजून एक शिलेदार म्हणजे भालू भट. देवळाचा पुजारी, ज्योतिषी, भट सर्वकाही. त्याच्या जन्मापासून मरेपर्यंत गावकऱ्यांनी त्याच्या अंगावर कधीच शर्ट, सदरा तत्सम प्रकार पाहिले नाही. सदा आपला उघडाबंब. पण आपल्या कामात हुशार. एक नंबर चिंगूस माणूस. आपल्या परसातल्या पानवेलीची पाने पूजेला वापरायचा आणि आमच्या घरी येऊन पान खायचा सासऱ्यांच्या डब्यातील. अर्थात सासऱ्यांंना त्याचे सोयरसुतक नव्हते कधी. खूप गट्टी दोघांची. एरवी गबाळा दिसणारा भालू भट खरा खुलायचा तो सातेरी उत्सवाच्या वेळी. त्याच्या शुद्ध मंत्रोच्चाराने गाभारा कसा भारून जायचा. असो! जगाकडे पैशासाठी वाणपण करणाऱ्या भालू भटने आमचे सासरे गेले त्यावेळी क्रियाकर्माची दक्षिणा म्हणून फक्त सव्वा रुपया बिदागी घेतली. मैत्री जागवली पण त्याने!
आमचा यशवंत खानोलकर म्हणजेच येशा बामण, वय जवळ जवळ सत्तरच्या आसपास. पण अख्ख्या गावात त्याला लहान-थोर येशा बामणच म्हणत. गावात सगळ्यात जास्त भाट त्याचे. हजारांनी आंबे-नारळ पडायचे. पण कायम रडका चेहरा. घरी आला की रडगाणे सुरू, "अप्पानू काय सांगू, ह्या वर्सा तसो आंबो जावकच नाय." हे त्याचे पेटंट वाक्य. मग कोणीतरी त्याला दोन दिवसांपूर्वी बागेतून एक ट्रक आंबा मुंबईला गेल्याची आठवण करून देई. त्यावर "ह्या! ता तसलाच ता!!" असे उत्तर देऊन विषय फिरवे. पण प्रत्येक सीझननंतर त्याच्या बायकोच्या अंगावर एक भांगराचा (सोन्याचा) दागिना दिसे नवा कोरा. एवढे दागिने की गावकरी गमतीने म्हणत, "अहो अप्पानू, येशा बामाणाच्या बायलेन जर सगळा भांगार घातला आंगावर, तर ती उभी राऊ शकणार नाय!" आणि मग जो हास्याचा खकाणा उडे की विचारता सोय नाही.
भाऊ परब हा अजून एक इरसाल. माणसाने कोडगे किती असावे ह्याचा नमुना अगदी. तसा गावचा पोस्टमन तो, पण लोकांची पत्रे फोडून वाचणे हा आवडीचा छंद. अर्थात अर्धा गाव निरक्षरच म्हणा, त्यामुळे मुंबईहून चाकरमान्यांचे पत्र आले तर गरज भाऊ परबाचीच लागे. पण इतका लोभी की त्याची बिदागी म्हणून नारळ, फणस मागायचा, तो तेसुद्धा अगदी बिनदिक्कत. वरती कोणी विचारले तर म्हणायचा, "पत्र वाचून दाखवण्याची ड्युटी माझी नाय. मी पगार घेतोय तो पत्र घराकडे देण्याचा, पत्र वाचण्याचा चार्ज वेगळा." आता ह्या युक्तिवादात चॅलेंज कोण करणार!
असे अनेक नग हो आमच्याकडे. पुढे पुढे येतीलच आपल्या भेटीला. फणस हो सगळे अगदी, वरून काटेरी पण आत अंतरंगात गोड अगदी. आता थोडे अंतरले इहलोकाला ह्या लिस्टातील, अंतू बरव्याच्या भाषेत 'देवगडाक गेले', तर काही अजूनही आहेत. अर्थात नवीन भर पडतेय म्हणा, का नाही पडणार भर? अहो, जोपर्यंत ह्या मातीत सुपीकपणा आणि हवेत सुशेगाद जीवन आहे ना, तोपर्यंत अशांची वानवा नाही हो कोकणात...

- सौ. रेशम जयंत झारापकर
मडगाव,गोवा