पट्टा बांधल्याने पोट तात्पुरते आत ओढले गेलेले दिसू शकते, पण तो खराखुरा उपाय नाही हे स्पष्ट आहे. पोट कमी करायचे असेल तर शॉर्टकटपेक्षा शास्त्रीय आणि शाश्वत मार्ग निवडणे अधिक आवश्यक आहे.

आरशात स्वतःकडे पाहताना पोटावरची वाढलेली चरबी अनेक महिलांना खटकते. विशेष करून प्रसूतीनंतर पोट सुटायला एकदा चालू झालं की परतीची वाटच विसरते. अशावेळी घरातील सल्ला ठरलेलाच असतो: “पट्टा बांध, पोट आपोआप आत जाईल.” काही दिवस पट्टा वापरल्यानंतर पोट थोडं आत गेलेलंही दिसतं... आणि इथूनच सुरू होतो एक मोठा गैरसमज. खरोखरच पट्टा बांधल्याने पोट कमी होतं का, की हा फक्त तात्पुरता बदल आहे? या समजुतीमागचं खरं विज्ञान जाणून घेणं आजच्या काळाची गरज आहे.
पट्टा म्हणजे नेमकं काय?
अॅब्डॉमिनल पट्टा, ब्रेस, टमी ट्रीमर किंवा वेस्ट ट्रेनर म्हटला जाणारा हा पट्टा पोटाभोवती घट्ट बांधला जातो. त्यामुळे पोट आत खेचल्यासारखं दिसतं आणि शरीराचा आकार सडपातळ वाटतो. ताणामुळे काढल्यानंतरही काही वेळ स्नायू घट्ट वाटत राहतात. मात्र ह्याचा हा परिणाम फक्त बाह्य स्वरूपापुरताच मर्यादित असतो.
मिथक कुठे आहे?
पट्टा बांधल्याने शरीरातील चरबी किंवा स्नायूंचा कमकुवतपणा कमी होत नाही. चरबी कमी होण्यासाठी शरीरात कॅलरी डेफिसिट निर्माण होणं आवश्यक असतं. म्हणजे घेतलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरीज खर्च होणं. तसेच पट्ट्यामुळे केवळ पोटावरील स्नायू तात्पुरते दाबले जातात, पण बळकट होत नाहीत. पट्टा पोट कमी करण्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम करत नाही. त्यामुळे “पट्टा = पोट कमी” ही समजूत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची आहे.
तात्पुरता फरक का जाणवतो?
पट्टा बांधल्यावर पोट घट्ट धरलं जातं, त्यामुळे ते आत गेलेलं वाटतं. पट्ट्याच्या वापराने काही महिलांना प्रसूतीनंतर सैल झालेल्या स्नायूंना आधार मिळाल्याने आरामही जाणवतो. याशिवाय, पट्टा वापरताना आपलं पोश्चर नक्कीच सुधारतं, ज्यामुळे पोट कमी झाल्यासारखं वाटू शकतं. मात्र हे सर्व परिणाम तात्पुरते असतात.
हार्मोन्स आणि पोटावरची चरबी
महिलांमध्ये पोटावर चरबी साचण्यामागे केवळ आहारच कारणीभूत नसतो. हार्मोन्समध्ये होणारे बदल, विशेष करून प्रसूतीनंतर, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), थायरॉईड समस्या यामुळेही पोटाभोवती चरबी वाढू शकते. त्यामुळे केवळ बाह्य उपायांवर (जसे पट्टा) अवलंबून राहणे अपुरे ठरते.
प्रसूतीनंतर पट्टा वापरण्यास
का सांगितले जाते?
प्रसूतीनंतर काही काळासाठी डॉक्टर अॅब्डॉमिनल सपोर्ट बेल्ट (ब्रेस) वापरण्याचा सल्ला देतात. यामुळे सुरुवातीच्या दिवसांत हालचाली करताना पोटाचे स्नायू आणि पाठ यांना आधार मिळतो, यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. मात्र हा वापर वजन कमी करण्यासाठी नसून केवळ सपोर्टसाठी असतो. चुकीच्या पद्धतीने किंवा खूप घट्ट पट्टा बांधल्यास उलट त्रास होऊ शकतो. हा पट्टा दीर्घ काळासाठी वापरत राहिल्यास पट्ट्याद्वारे बाह्य सपोर्ट मिळत राहिल्याने अॅब्डॉमिनल स्नायू बळकट न होता कमकुवतपणा उलट वाढू शकतो.
सतत पट्टा वापरण्याचे तोटे
सतत पट्टा वापरल्यास शरीरातील अॅब्डॉमिनल-कोर स्नायू कमकुवत होऊ शकतात, याचं कारण म्हणजे स्नायूंचं नैसर्गिक काम कमी होतं. म्हणजेच स्नायूंची आकुंचन आणि शिथिलीकरण प्रक्रिया कमी होते. तसेच, खूप घट्ट पट्टा बांधल्याने पाठीच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येऊन पाठीच्या दुखण्यात वाढ होऊ शकते, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, पचनसंस्थेवर सतत दबाव राहिल्याने पचनाच्या तक्रारी उद्भवतात आणि रक्ताभिसरण मंदावल्याने कंबरेच्या नसांवर दाब येऊन पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे असे प्रकार घडू शकतात. काही वेळा त्वचेला हवा न लागल्याने त्वचेवर पुरळ किंवा घामामुळे त्रासही होऊ शकतो.
जीवनशैलीचा मोठा प्रभाव
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत कमी हालचाल, अनियमित आहार, ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे वजन वाढणे आणि विशेषतः पोटावर चरबी साचणे ही सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी होलिस्टिक अप्रोच/ समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे.
नेमका उपाय काय?
पोट कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हेच खरे उपाय आहेत. विशेष करून कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठीचे व्यायाम जसे प्लॅंक्स, क्रंचेस, पिलाटेस, विशीष्ट योगासने हे पोटाचे स्नायू मजबूत करतात. यासोबतच चालणे, सायकलिंग किंवा कार्डिओ व्यायामामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. भरपूर पाणी पिणे आणि प्रोसेस्ड खाणं टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
शेवटी, पट्टा बांधल्याने पोट तात्पुरते आत ओढले गेलेले दिसू शकते, पण तो खराखुरा उपाय नाही हे स्पष्ट आहे. पोट कमी करायचे असेल तर शॉर्टकटपेक्षा शास्त्रीय आणि शाश्वत मार्ग निवडणे अधिक आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य झोप आणि ताणाचे व्यवस्थापन हीच खरी ‘फिटनेस बेल्ट’ आहे जी शरीराला आतून मजबूत करते.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर