मायेची हक्काची सावली

घरी गेले की जाणवते, वास्तू जणू खुश झाली आहे. सगळीकडे उगीचच प्रसन्न वाटू लागते. आजही सणासुदीला सगळे जमतात, एकत्र धमाल करतात. लेकरांना पाहून ती वास्तू सुखावते.

Story: सहज सुचलेलं |
15th May, 09:42 pm
मायेची हक्काची सावली

आ​मचे सासरचे गावचे घर तसे मोठे आणि ऐसपैस. जणू एखादा वाडाच म्हणा हवे तर! कोकणात अगदी गोवा हद्दीजवळच असलेल्या आमच्या गावातूनच मुंबई-गोवा हायवे जातो, त्यामुळे गावाला नकाशावर तसे महत्त्व. बाकी गाव तसा निवांत. सकाळी तिठ्यावर शाळेत जाणाऱ्या मुलांची आणि एसटीतून उतरणाऱ्या, कुडाळहून आलेल्या 'नुस्तेकारांची' लगबग संपली की मग बाजाराला तसा काही अर्थ नसायचा. एक छोटेसे किराणा दुकान आणि गुरवाचे छोटे हॉटेल, त्यात मोजून तीन ते चार पदार्थ... हाच आमचा बाजार.

तर, तिठ्यावर उतरल्यानंतर सरळ मातीच्या गाडी रस्त्याने पाच मिनिटे चालले की समोरच दिसते ते आमचे वडिलोपार्जित घर. अंगणात प्रवेश करतानाच बाजूला एक विहीर आहे, खूप जुनी! हीच आमच्या घराची खूण. अगदी पोस्टाच्या पत्त्यावर सुद्धा 'विहिरीच्या बाजूला' असा उल्लेख बऱ्याचदा असे. प्रशस्त सारवलेले अंगण आणि मधोमध बैठी, पण दगडी बांधकामाची छोटी तुळस. आसपास अबोली, अनंत आणि गावठी गुलाबाची झाडे. ओसरीवर प्रवेश केल्यानंतर एका कोपऱ्यात 'कर्रर्र' असा आवाज करणारा मोठा सागवानी झोपाळा आणि एक सागवानी आरामखुर्ची. थोडक्यात सांगायचे तर, सिंधुदुर्गात नेहमी दिसणारे एक टिपिकल कोकणी माणसाचे घर!

माझे सासर पक्के मुंबईकर जरी असले, तरी गावची नाळ तुटली नव्हती. कधी गणपती, जत्रा, तर कधी उन्हाळी सुट्टी; काही ना काही कारणाने परळ डेपोत आमची 'परळ-सावंतवाडी' एसटीची तिकिटे बुक असतच. रेल्वे तर नंतर आली. आमचे लग्न जरी गोव्यात झाले, तरी स्पेशल बसने मुंबईला जाताना आम्ही वाटेत गावात थांबलो. घरी गेलो आणि खरा गृहप्रवेश तिथेच झाला. माझे चुलत सासरे आणि सासूबाई तेव्हा तिथे राहत असत. खरे सांगू? त्यावेळी अवघी अर्ध्या तासाची भेट झाली त्या घराशी, पण चटकन आपलेपणाचे नाते जुळले आणि मनात एका जाहिरातीची टॅग लाईन आठवली, ‘यही है राईट चॉईस!’ त्यानंतर मग गावी येणे सतत चालूच राहिले.

एसटीचे एक बरे असते, ती कितीही मोडकी असो, खडखडणारी असो किंवा रस्ते खराब असोत, पण वेळेवर पोहोचते. परळला संध्याकाळी बसल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या आसपास 'झाराप तिठा...' असा कंडक्टरचा पुकारा ऐकू येई. आंबलेले अंग घेऊनच आम्ही तिठ्यावर उतरत असू, पार थकलेले! पण काय सांगू, सामान उचलायला आलेल्या गड्याच्या (झिल्ग्याच्या) "वहिनीनू इलात! प्रवास बरो झालो मा?" या प्रेमळ प्रश्नाने अर्धा शीण निघून जाई. मग भेटत दत्तू शेट, किराणा दुकानाचे मालक. हसतमुख चेहऱ्याने ते सामोरे येत आणि मग उरलेला थकवाही पळून जाई. खरंच हो, प्रसन्न हसणे हा प्रकार कोकणातूनच पसरला असावा, असे माझे मत आहे. सगळी टेन्शन्स पचवून सदा हसतमुख राहणे हे कोणी कोकणी माणसाकडूनच शिकावे.

घरी पोहोचलो की सासूबाईंच्या हातचा गुळाचा चहा गरमागरम गावठी पोह्यांबरोबर मिळे. मग थंडगार विहिरीच्या पाण्याची आंघोळ झाली की गप्पाटप्पांना सुरुवात होई. सोबतीला जेवणाची लगबग असेच. ताजे फडफडीत बांगडे साफ करताना घरातल्या मांजरांपासून ते सांभाळणे ही एक कलाच होती. अर्थात, मी पक्की 'गोवेकरीण' असल्यामुळे माझ्याकडून एकही बांगड्याची चोरी होत नसे.

चवथ किंवा जत्रा असली की घरात कायम पाहुण्यांचा राबता असे. गावकीची भांडी, देवाच्या वस्तू गावकरी आमच्याच घरात ठेवत. त्यासाठी एक वेगळी खोली होती. कोणाच्याही घरी लग्न किंवा मुंजीसाठी भांडी लागली, तर ती आमच्या सासऱ्यांकडून घेऊन जात. पण एवढ्या वर्षांत कधीच त्यात खोट आली नाही! पूर्वी सगळा व्यवहार रोखठोक असे. आमच्या आजेसासू एका मोठ्या लाकडी द्रोणात 'आंबल्या' (कोकम) खारवून ठेवत असत. अडीअडचणीला किंवा आजारपणात पेजेसोबत खाण्यासाठी कोणीही त्या मागून नेत असे, कोणाचा त्याला नकार नसे. गावच्या सातेरी उत्सवाच्या मिटिंगा आमच्याच घरात भरत. त्यावेळी देवळाचे 'भालू भट' हे मुख्य असत. उघडाबंब देह, अंगात एक कळकट जानवे आणि कमरेला पंचा, अशा वेशातच भालू भट गावभर फिरत; पण मुहूर्त काढण्यात मात्र एकदम पटाईत होते. असो!

गावात कसलाही तंटा होवो, त्याचा निकाल शक्यतो आमच्याच घरात लागत असे. गावकऱ्यांची त्या घराबद्दल एक श्रद्धा आणि प्रेम होते, जे आजही आहे. घर आता जुने झाले आहे, त्याने आमच्या गावच्या पाच-सहा पिढ्या पाहिल्या आहेत, पण त्याचा ताठा अजूनही मजबूत आहे. त्या वास्तूने जणू आमच्यावर मायेची हक्काची सावली धरली आहे. घरी गेले की जाणवते, वास्तू जणू खुश झाली आहे. सगळीकडे उगीचच प्रसन्न वाटू लागते. आजही सणासुदीला सगळे जमतात, एकत्र धमाल करतात. लेकरांना पाहून ती वास्तू सुखावते. तुम्हाला माहित आहे? आम्ही जेव्हा परत मुंबईला निघतो, तेव्हा घराला "जातो" असे कधीच म्हणत नाही, तर "बरं, येतो हा!" असे म्हणतो... आणि खरोखर, त्यावेळी घराबाजूचा आंबा उगाचच सळसळतो!


- सौ. रेशम जयंत झारापकर

मडगाव,गोवा