बेळगाव, गोव्यातील अनेक कुटुंबांनी घेतली धास्ती

बेळगाव : बेळगावातील शिवम असोसिएट्स या संस्थेशी संबंधित तब्बल सुमारे ४,६०० कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर बेळगाव आणि गोवा परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते आणि तपास यंत्रणांच्या मते, बेळगाव, गोवा व शेजारील राज्यांमधील निवृत्त कर्मचारी, माजी सैनिक आणि लघुउद्योजकांसह मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांनी गेल्या काही वर्षांत या योजनेत मोठी रक्कम गुंतवली असण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेबी यांच्या आवश्यक नियमांचे पालन न करता शिवम असोसिएट्सने जनतेकडून निधी गोळा केल्याचा आरोप झाल्यानंतर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीच्या चौकशीचे आदेश दिले. कथित आर्थिक गैरव्यवहाराचे स्वरूप व्यापक होत असल्याने हा तपास लवकरच सीआयडीकडे सोपविण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून विशेष तपास पथक नेमले जाणार आहे.
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे ४५ हजार गुंतवणूकदार या नेटवर्कशी संबंधित असल्याचा अंदाज असून त्यापैकी अनेक जण गोवा आणि बेळगाव सीमाभागातील आहेत. शिवम असोसिएट्स आणि त्याचे प्रवर्तक शिवानंद नीलण्णावर यांच्याशी संबंधित तीन कार्यालये आणि काही फ्लॅट्स प्रशासनाने सील केले आहेत. संस्थेने अनधिकृत गुंतवणूक योजनांद्वारे सुमारे २,५०० कोटी ते ४,६०० कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप आहे.
गुरुवारी उशिरापर्यंत आणि शुक्रवारी दिवसभर करण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान अधिकाऱ्यांनी संगणक, लॅपटॉप तसेच शेकडो कोटी रुपयांच्या बाँड कागदपत्रांचा जप्ती पंचनामा केला. तपासादरम्यान सुमारे ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आढळल्यानंतर चार बँक खाती गोठविण्यात आली आहेत. उर्वरित निधी कुठे वळविण्यात आला याचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणा करीत आहेत.
या घडामोडींमुळे गोव्यातील गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी आपली आयुष्यभराची बचत गुंतवल्याची भीती व्यक्त होत आहे. सीमाभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, संस्थेशी संबंधित एजंटांनी गोवा आणि आसपासच्या भागांमध्ये सक्रियपणे गुंतवणूकदारांशी संपर्क साधला होता.
बेळगावातील सर्वांत मोठा घोटाळा
व्हिसलब्लोअर आणि आरटीआय कार्यकर्ते राजकुमार टोप्पण्णावर यांनी या प्रकरणाला बेळगावच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, असे संबोधत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्यांनी आरोप केला की, अनेक निष्पाप नागरिक, त्यात गोव्यातील नागरिक आणि माजी सैनिकांचाही समावेश आहे, हे अधिकृत परवानगीशिवाय चालविण्यात आलेल्या कथित पाँझी प्रकारच्या योजनांचे बळी ठरले आहेत. तसेच, बेळगावातील सिटी इंडेक्स आणि आदित्य राज कॅपिटल यांसारख्या उच्च परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या इतर संस्थांचीही चौकशी करण्याची मागणी तोप्पण्णावर यांनी केली आहे. दरम्यान, मालमारुती पोलीस आणि महसूल विभागाकडून तपास सुरू असून, हजारो गुंतवणूकदार त्यांच्या पैशांचे भवितव्य काय होणार याबाबत चिंतेत आहेत.