बार्देश : हडफडे-नागवा प्रभाग ३ मधून दीपिका रेडकर बिनविरोध

पती रोशन रेडकर अपात्र ठरल्यामुळे पद रिक्त होते

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
बार्देश : हडफडे-नागवा प्रभाग ३ मधून  दीपिका रेडकर बिनविरोध

म्हापसा : हडफडे-नागवा पंचायतीच्या (Arpora Nagoa Panchayat) प्रभाग क्रमांक ३ च्या पोटनिवडणुकीत (by election) माजी सरपंच रोशन रेडकर (Roshan Redkar) यांची पत्नी दीपिका रोशन रेडकर पंच (Deepika Redkar elected unopposed as Panch member) म्हणून बिनविरोध विजयी झाली आहे. बर्च क्लब दुर्घटनेला (fire incident at Birch by Romio Lane) कारणीभूत धरत रोशन रेडकर यांना पंचायत संचालनालयाने पंच म्हणून अपात्र ठरविल्यामुळे हे पद रिक्त होते.

येत्या २४ मे रोजी होणाऱ्या या प्रभाग पोटनिवडणुकीसाठी एश्ली डिसोझा, दीपिका रेडकर, सुनील रेडकर व महादेव हरमलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सुनील व महादेव हे दीपिका रेडकर यांचे डमी उमेदवार होते.

पोटनिवडणूक वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ मे होती, तर १४ मे रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. शुक्रवारी १५ रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वरील तिघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने रेडकर यांच्या विजयाची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी तथा मामलेदार अनंत मळीक यांनी केली आणि त्यांना पंच पदाचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. यावेळी पती रोशन रेडकर उपस्थित होते.

दीपिका रेडकर या माजी सरपंच असून मागील पंचायत मंडळात त्यांनी सरपंचपद भूषविले होते. तसेच पंचायत प्रभाग ३ हा या रेडकर दाम्पत्याचा बालेकिल्ला म्हणून गावात ओळखला जातो.

या विजयानंतर रोशन रेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे मतदारांचे विशेष आभार मानले आहेत.

रोशन यांच्यावर होता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

हडफडे येथील प्रसिद्ध बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये गेल्या ६ डिसेंबर रोजी रात्री भीषण अग्नीतांडव दुर्घटना घडली होती. या आग दुर्घटनेच्या चौकशीनंतर तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली होती. न्यायदंडाधिकारी चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे, पंचायत संचालनालयाने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत रोशन रेडकर यांना सरपंच तसेच पंच पदावरून अपात्र ठरवले होते. त्यामुळे हडफडे-नागवा पंचायतीच्या प्रभाग ३ मधील ही जागा रिक्त झाली होती.

हेही वाचा