डॉ. केतन भाटीकर यांना वाहिली श्रद्धांजली

पणजी : डॉ. केतन भाटीकर कधीच आमदार झाले नसले तरी फोंडा विधानसभा मतदारसंघात (Ponda assembly constituency) दोन वेळा उमेदवार होते. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत स्व. रवी नाईक (Ravi Naik) यांना चांगली टक्कर दिली होती. पोटनिवडणुकीत त्यांना मोठा प्रतिसाद मिळत होता; मात्र आदल्यादिवशी पोटनिवडणूक रद्द झाली.
पोटनिवडणुकीतील उमेदवारीमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्री व गोव्यातील नेत्यांसहीत राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तसेच केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी दु:ख व्यक्त केले. कॉंग्रेससहीत इतर पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा दु:ख व्यक्त केले.
डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar) यांच्या निधनाने मला दु:ख झाले. नामांकित फिजीओथेरपिस्ट असलेले डॉ. भाटीकर यांनी उपचार करण्यासहीत सामाजिक कार्य सुद्धा केले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनामुळे राजकीय तसेच वैद्यकीय क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनाने गोवा एका चांगल्या डॉक्टरला, सामाजिक कार्यकर्त्याला आणि राजकारण्याला मुकला. केवळ फोंडा परिसरात नव्हे तर पूर्ण गोव्यात त्यांना मान होता, असे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
डॉ. केतन भाटीकर यांचे अकाली निधन धक्का देणारे आहे. सामाजिक कार्य करणारे आणि राजकारणाची मोठी स्वप्ने पाहाणारे मित्र आमच्यामध्ये नाही, हे वास्तव स्वीकारणे बरेच कठीण जात आहे, असे केरळचे राज्यपाल तथा गोव्याचे सुपूत्र राजेंद्र आर्लेकर यांनी म्हटले आहे.