डॉ. केतन भाटीकरांच्या निधनापूर्वी काय घडले? धक्कादायक माहिती

मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11 mins ago
डॉ. केतन भाटीकरांच्या निधनापूर्वी काय घडले? धक्कादायक माहिती

पणजी : गोव्यातील प्रसिद्ध फिजिओ आणि राजकारणी डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. डॉ. भाटीकर यांच्यासोबत असलेल्या सुशांत कवळेकर यांनी दांडेली ते धारबांदोडा या प्रवासातील शेवटच्या काही तासांचा थरार मांडला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर दांडेली येथे एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी गेले होते. मिटिंग आटोपून रात्री गोव्याकडे परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. सुशांत कवळेकर यांनी सांगितले की ते लघुशंका करण्यासाठी एके ठिकाणी ठिकाणी थांबले. तेव्हा भाटीकर खाली उतरले. दरम्यान त्यांच्याकडील मोबाईल खाली पडला. . तो उचलत असताना त्यांना हाताला कोणीतरी चावा घेतल्याची जाणीव झाली. त्यांनी गाडीत बसण्याचा प्रयत्न केला त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्या वेळी जोरदार पाऊस सुरू होता आणि रस्त्यावर चिखल असल्याने गाडी चालवणे कठीण झाले होते. माझे हातपाय गार पडले होते, काहीच सुचत नव्हते,असे कवळेकर म्हणाले. 




अखेर गाडी थांबवून डॉ. भाटीकरांच्या भावाला आणि मित्रांना फोन करून रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती करण्यात आली. कवळेकरांनी पुढे सांगितले की, पहिली रुग्णवाहिका येण्यास वेळ लागत असल्याने आम्ही दुसरी १०८ रुग्णवाहिका बोलावली. त्यांना गाडीतून शिफ्ट करेपर्यंत त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. धारबांदोडा परिसरात पाऊस आणि रेंजच्या समस्येमुळे मदत मिळण्यास विलंब झाला. यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. 

त्यांच्या निधनाबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बाळकृष्ण यांनी 'प्रुडेंट मीडिया'शी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. केतन भाटीकर यांना पहाटे ३:२० ते ३:३२ च्या सुमारास रुग्णालयात आणले गेले. मात्र, यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉ. बाळकृष्ण यांनी सांगितले की, ज्यावेळी त्यांना रुग्णालयात आणले, तेव्हा ते कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. आम्ही तातडीने ईसीजी (ECG) काढला, जो पूर्णपणे फ्लॅट होता. सर्व प्रकारचे आपत्कालीन उपचार देऊनही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर पहाटे ३:४५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.




मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. फोंडा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही गंभीर जखम नव्हती, मात्र शरीरावर काही ठिकाणी किरकोळ ओरखडे किंवा खुणा असू शकतात, ज्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालात होईल.


हेही वाचा