पंजाबचे शुक्लकाष्ट संपेना; मुंबईचा ६ गडी राखून विजय

तिलक वर्माची वादळी खेळी : प्रभसिमरन सिंगचे अर्धशतक वाया

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
53 mins ago
पंजाबचे शुक्लकाष्ट संपेना; मुंबईचा ६ गडी राखून विजय

धर्मशाला : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ मधील ५८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा ६ गडी राखून पराभव केला. पंजाबने विजयासाठी ठेवलेले २०१ धावांचे आव्हान मुंबईने ७ चेंडू राखून अत्यंत दिमाखात पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो युवा फलंदाज तिलक वर्मा, ज्याने आपल्या फटकेबाजीने पंजाबच्या गोलंदाजांना हतबल केले.
२०१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर रयान रिकलटनने अवघ्या २३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४८ धावांची वेगवान खेळी केली. रोहित शर्मा (२५ धावा) बाद झाल्यानंतर मुंबईची धावसंख्या ९.३ षटकात ८८/३ अशी असताना तिलक वर्माने डावाची सूत्रे हाती घेतली.
तिलक वर्माने पंजाबच्या गोलंदाजांवर तुटून पडताना ३३ चेंडूत ७५ धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने ६ उत्तुंग षटकार आणि ६ चौकार खेचले. त्याला अखेरच्या षटकांत विल जॅक्सने (१० चेंडूत २५ धावा) मोलाची साथ दिली. या दोघांनी ५व्या विकेटसाठी अवघ्या २० चेंडूत ५६ धावांची अभेद्य भागीदारी करत मुंबईला १९.५ षटकात विजय मिळवून दिला.
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना आज आपल्या लयीत राहता आले नाही. अझमतुल्ला ओमरझाईने ३६ धावांत २ बळी घेतले खरे, पण मार्को यान्सेन (५५ धावा) आणि झेविअर बार्लेट (५३ धावा) यांना मुंबईच्या फलंदाजांनी लक्ष्य केले. युझवेंद्र चहलने ३२ धावांत १ बळी घेत काहीसा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला नाही.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंजाबच्या सलामीवीरांनी हा निर्णय काहीसा चुकीचा ठरवला. प्रभसिमरन सिंगने अवघ्या ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. त्याला प्रियांश आर्याने २२ धावांची जोड दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली.
मधल्या फळीत श्रेयस अय्यर (४ धावा), शशांक सिंग (२ धावा) आणि मार्को यान्सेन (२ धावा) स्वस्तात बाद झाल्यामुळे पंजाबची धावसंख्या काही काळ अडखळली होती. मात्र, अझमतुल्ला ओमरझाईने केवळ १७ चेंडूत ३८ धावांची (२ चौकार, ४ षटकार) स्फोटक खेळी करत धावसंख्येला वेग दिला. अखेरच्या षटकांत झेविअर बार्लेटने १८ आणि विष्णू विनोदने नाबाद १५ धावांचे योगदान देत पंजाबला २०० धावांपर्यंत पोहोचवले.
मुंबई इंडियन्सकडून शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने आपल्या ४ षटकांत ३९ धावा देऊन ४ महत्त्वाचे बळी टिपले. अनुभवी दीपक चहरने ३६ धावांत २ बळी घेतले, तर जसप्रीत बुमराहला आजही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही, त्याला ४ षटकांत ३५ धावा देऊन एकही बळी मिळवता आला नाही. कोर्बिन बॉशने एक गडी बाद केला.
प्रभसिमरन सिंग प्रियांश आर्यच्या जोडीचा मोठा विक्रममुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात पंजाबच्या धावसंख्येने २४ धावांचा टप्पा पार करताच या जोडीने हा खास विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यातही दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, दीपक चहरने प्रियांश आर्यला २२ धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली.बॉक्स
पंजाब किंग्जचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे. आयपीएलच्या इतिहासात १००० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी ही पहिली अनकॅप्ड सलामीवीर जोडी ठरली.
प्रभसिमरनचा विक्रम
प्रभसिमरन सिंगनेही आणखी एक मोठा टप्पा गाठला. २०२५ मध्ये ५४९ धावा आणि २०२६ मध्ये ४३९ धावा करणारा प्रभसिमरन, आयपीएलच्या एकापेक्षा अधिक हंगामांत ४०० हून अधिक धावा करणारा तिसरा अनकॅप्ड भारतीय फलंदाज ठरला. याआधी सूर्यकुमार यादव (२०१८, २०१९, २०२०) आणि अभिषेक शर्मा (२०२२, २०२४) यांनी ही कामगिरी केली होती.
एका स्पर्धेत सर्वाधिक वेळा २०० हून अधिक धावा
८ वेळा: गुजरात टायटन्स (२०२५)
८ वेळा: पंजाब किंग्स (२०२५)
८ वेळा: सनरायझर्स हैदराबाद (२०२६)
८ वेळा: पंजाब किंग्स (२०२६)
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स: २० षटकात २००/८ (प्रभसिमरन ५७, ओमरझाई ३८; शार्दूल ४/३९)
मुंबई इंडियन्स: १९.५ षटकात २०५/४ (टिळक वर्मा ७५*, रिकलटन ४८; ओमरझाई २/३६)