राष्ट्रीय स्तरावर चमकले गोव्याचे नाव : आदित्य सामंतसह तिघांनी मिळविले उल्लेखनीय यश

वाळपई : ‘डेक्कन कॉन्करर’ या पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित मोटरस्पोर्ट स्पर्धेत गोव्याच्या तीन युवा रायडर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. वेग, सहनशक्ती, तांत्रिक कौशल्य आणि मानसिक स्थैर्याची कठोर परीक्षा पाहणाऱ्या या स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आदित्य सामंतची बहारदार कामगिरी
आदित्य सामंत या कोपर्डे-वाळपई सत्तरी येथील युवा रायडरने स्पर्धेत प्रभावी प्रदर्शन करत तीन वेगवेगळ्या गटांत मानाचे स्थान पटकावले. त्याने रॉयल एनफिल्ड वर्गात द्वितीय क्रमांक मिळवला, तर इंटरमिजिएट वर्गात तृतीय क्रमांक पटकावत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची छाप उमटवली. याशिवाय इंडियन ओपन वर्गात पाचवे स्थान मिळवत त्याने बहुगुणी रायडर म्हणून स्वतःची ओळख अधिक मजबूत केली. कठीण ट्रॅक, लांब अंतर आणि वेगवान स्पर्धकांमध्ये आदित्यने दाखवलेले धैर्य आणि नियंत्रण विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.
गोव्याच्या अन्य दोन युवा रायडर्सनीही स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अविरल गुरूंग याने बिगिनर्स वर्गात द्वितीय क्रमांक मिळवून आपली क्षमता सिद्ध केली. तर सुफियान खान याने त्याच गटात चौथे स्थान पटकावत स्पर्धेत आपला ठसा उमटवला. या तिन्ही रायडर्सच्या यशामुळे गोव्याच्या मोटरस्पोर्ट क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
आदित्य सामंत याने यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मोटरसायकल रेसिंग स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने विविध स्पर्धांत अनेक पुरस्कार आणि मानचिन्हे पटकावत गोव्याचे प्रतिनिधित्व यशस्वीपणे केले आहे. त्याच्या सातत्यपूर्ण यशामुळे सत्तरी तालुक्यासह संपूर्ण गोव्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी आणि मोटरस्पोर्ट क्षेत्रातील जाणकारांकडून त्याच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक करण्यात येत आहे.
डॉ. दिव्या राणेंकडून अभिनंदन
पर्येच्या आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी आदित्य सामंत, अविरल गुरूंग आणि सुफियान खान या तिन्ही रायडर्सचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, गोव्याच्या युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव उज्ज्वल केले असून मोटरस्पोर्टसारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही गोमंतकीय युवक पुढे येत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. त्यांनी तिन्ही खेळाडूंना भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत राज्य सरकारकडून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर भर दिला.