खडी क्रशरसाठी लागणारी मशीन, ट्रक जप्त

पेडणे : खाण आणि भूगर्भ खात्यातील अधिकाऱ्यांनी पेडणे तालुक्यातील इब्रामपूर हणखणे ग्रामपंचायत क्षेत्रात खडी क्रशरसाठी लागणाऱ्या काळ्या दगडाच्या बेकायदेशीर खाणीवर छापा टाकून मशीन आणि ट्रक जप्त केले. याबाबत मोपा पोलीस ठाण्यात खाण खात्याकडून तक्रार दाखल करण्यात आली असून क्रशर व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.
मोपा पोलीस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, पेडणे तालुक्यातील इब्रामपूर हणखणे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खडी क्रशर व्यवसाय चालतो. त्यासाठी लागणाऱ्या काळ्या दगडाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. यातील काही खाणी बेकायदेशीर असून याची माहिती मिळताच खाण आणि भूगर्भ खात्यातील अधिकाऱ्यांनी सोमवार दि. ११ मे रोजी दुपारी २ वाजता छापा टाकला.
यानंतर खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोपा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोपा पोलीस दुपारी साडेतीन वाजता घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत खाण खात्याकडून दगड फोडणारे मशीन आणि ट्रक जप्त करून मोपा पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आले. मात्र, खाण मालकांचा तपास लागला नाही. या भागात किती प्रमाणात बेकायदेशीर खाणी आहेत, याचा तपास खाण खात्याचे अधिकारी घेत आहेत.
गेल्या दोन तीन दशकांपासून पेडणे तालुक्यातील इब्रामपूर हणखणे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खडी क्रशर व्यवसाय चालत आहे.
मोपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील किनळेकर अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणाने खडी क्रशर व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.