अती वेग, बेदरकारपणा ठरतोय जीवघेणा : अपघातांचे प्रमाण घटले, दुचाकीस्वारांचे मृत्यू सर्वाधिक

पणजी : राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असून, वाहन चालवताना करण्यात येणारी घाई आणि बेदरकारपणा अनेकांच्या जिवावर बेतत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, राज्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात तब्बल २८९ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत. बहुतांश मृत्यू हे केवळ अती वेग आणि चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ‘भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या’ या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. राज्यात २०२४ मध्ये एकूण २,६८२ रस्ते अपघातांची नोंद झाली. यामध्ये २८९ जणांचा मृत्यू झाला. यातील २७८ मृत्यू (९६.१९ टक्के) बेजबाबदार, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे अथवा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे किंवा अती वेगाने वाहने चालवल्यामुळे झाले आहेत. तसेच, मद्यपान करून अथवा अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवणाऱ्या ५ जणांचाही मृत्यू झाला आहे.
अहवालानुसार, राज्यात २०२४ मध्ये रस्ते अपघातात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याने १६७ जणांचा, तर अती वेगाने वाहन चालवल्याने ११३ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय रस्त्यावर जनावर आडवे आल्याने १२ अपघात झाले, ज्यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केल्याने २ जणांचा मृत्यू झाला. खराब रस्त्यामुळे आणि वाहन चालकाच्या शारीरिक समस्या उद्भवल्याने प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. वाहन चालवताना अचानक खराब झाल्याने २ अपघात झाले व त्यात एक जण जखमी झाला, मात्र या कारणामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
अपघातांच्या प्रमाणात घट
राज्यात २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण ५.८ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर जखमींचे प्रमाण २.४० टक्के व मृत्यूचे प्रमाण १.०२ टक्क्यांनी कमी झाले आहे.
२०२३ मध्ये एकूण २,८४७ रस्ते अपघातांमध्ये २९२ जणांचा मृत्यू झाला होता. यातील धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याने १२७, अती वेगाने वाहन चालवल्याने १५४, मद्यपान करून वाहन चालवल्याने ६, तर रस्त्यावर जनावर आडवे आल्याने २ जणांचा मृत्यू झाला होता.
चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केल्याने, वाहनात बिघाड झाल्याने आणि वाहन चालकाला शारीरिक समस्या आल्याने प्रत्येकी एका जणाचा मृत्यू झाला होता.
दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू
राज्यात २०२४ मध्ये महिन्याला सरासरी ८७ रस्ते अपघात तर सरासरी २४ मृत्यूंची नोंद झाली. एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक २०९ (७२ टक्के) जण दुचाकी चालवत होते. १६ कार चालक, ८ ट्रक चालक, ३ तीन चाकी चालक, तर ४ सायकल चालकांचा मृत्यू झाला होता.