अपघातात जखमी पर्यटकाची मृत्यूशी झुंज संपुष्टात

सहा महिन्यांपूर्वी अपघात, उपचारादरम्यान मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 11:57 pm
अपघातात जखमी पर्यटकाची मृत्यूशी झुंज संपुष्टात

मडगाव : गोवा फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक विजयराज (२९, रा. गाझियाबाद) याचा पाडी काणकोण येथे सहा महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. गंभीर जखमी प्रतीकवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली.

पाडी काणकोण परिसरात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या उत्तर प्रदेशातील पर्यटकाचा अखेर मृत्यू झाला. प्रतीक विजयराज याच्यावर गाझियाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. प्रतीक विजयराज १७ डिसेंबर २०२५ रोजी पत्नीसोबत पर्यटनासाठी गोव्यात आला होता. कुंकळ्ळीहून काणकोणच्या दिशेने दुचाकीने जात असताना पाडी येथे त्याच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात प्रतीक याच्यासह त्याची पत्नी शालिनी चौधरी यादेखील जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर प्रतीक याच्यावर गोव्यात उपचार करण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी त्यांना गाझियाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सहा महिने मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपुष्टात आली. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहेत.