
फोंडा : बेतोडा येथे बुधवारी रात्री स्कूटरवरून जात असताना दिनेश तुळशीदास गावडे (४८, उडीवाडा- उसगाव) याला गव्याचा धक्का बसून मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांत गव्याच्या हल्ल्यात दोन बळी गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिनेश तुळशीदास गावडे हा फोंडा पोलीस हद्दीत गृहरक्षक म्हणून काम करीत होता. फोंडा पोलिसांनी रात्री घटनेचा पंचनामा केला.
बेतोडा व फोंडा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गव्याचा संचार सुरू आहे. बुधवारी रात्री स्कूटरवरून जात असताना अचानक गवा रस्त्यावर आल्याने स्कुटरची धडक बसून चालक गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुरुवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.
बोणबाग येथे गेल्यावर्षी गव्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. दोन वर्षात बेतोडा भागात गव्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.