सम्राट क्लब इंटरनॅशनलतर्फे आयोजन

पत्रकार परिषदेला उपस्थित मंगेश गावकर, शशिकांत पुनाजी, विनोद मळीक, सुबोध रामनाथकर, रोहन घाडी, सपना परब, अर्चना सिनारी व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ तर्फे २० व्या ‘सम्राट संगीत सितारा’ शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या रविवार, १० मे ते २१ जूनपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंगेश गावकर यांनी. शनिवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शशिकांत पुनाजी, विनोद मळीक, सुबोध रामनाथकर, रोहन घाडी, सपना परब, अर्चना सिनारी व अन्य उपस्थित होते.
गावकर यांनी सांगितले की, पाहिली प्राथमिक फेरी १० मे रोजी सावंतवाडी येथे, २४ मे रोजी दक्षिण गोवा येथे, ३० मे रोजी उत्तर गोवा येथे, तर ७ जून रोजी बेळगाव येथे पार पडणार आहे. १४ जून रोजी उपांत्य फेरी, तर २१ जून रोजी अंतिम फेरी होणार आहे. उपांत्य आणि अंतिम फेरी कला अकादमी येथे होईल. उदयोन्मुख आणि हौशी गायकांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धा हौशी कलाकारांसाठी असून यामध्ये व्यावसायिक कलाकारांना भाग घेता येणार नाही. विजेत्याला २५ हजार रुपये, उपविजेत्याला २० हजार रुपये, तर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या कलाकाराला १५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल. तिघांना ५ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाईल. सोहळ्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रख्यात पं. डॉ. राम देशपांडे उपस्थित राहतील. पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर डॉ. देशपांडे गायन करणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्राथमिक फेरीच्या ३ दिवस आधीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करता येईल. प्रत्येक केंद्रावरील पहिल्या २० पात्र अर्जदारांनाच प्रवेश दिला जाईल. स्पर्धकांचे वय १५ ते २५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून वयाचा वैध पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. स्पर्धेची भाषा हिंदी, ब्रज असून स्पर्धा शास्त्रीय गायनावर आधारित आहे. १२ स्पर्धक उपांत्य फेरीसाठी निवडले जातील, त्यापैकी ६ स्पर्धक अंतिम फेरीत प्रवेश करतील, असे गावकर यांनी सांगितले.