वादळी वार्‍याचा मोबोर परिसराला फटका

पांझरखणी महामार्गावरील कारवर पडले झाड


09th May, 11:46 pm
वादळी वार्‍याचा मोबोर परिसराला फटका

कारवर कोसळलेले झाड हटवताना अग्निशामक दलाचे जवान.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : राज्यात सध्या अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. सासष्टीच्या विविध भागात शनिवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यात पांझरखणी परिसरात धावत्या कारवर झाड कोसळून नुकसान झाले. केळशी मोबोर परिसरात झाडे वीजतारांवर व गाडीवर पडल्याने नुकसान झाले.
राज्यात विविध भागात पावसाच्या सरी कोसळत असून सासष्टीत शनिवारी पावसाचे आगमन झाले. यावेळी पावसासह आलेल्या वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. मडगाव-कुंकळ्ळी महामार्गावर पांझरखणी येथे चालत्या कारवर झाड कोसळण्याची घटना सायं. ५.३० च्या सुमारास घडली. यावेळी कारमध्ये रॉनी फर्नांडिस व त्यांच्या पत्नी अ‍ॅना दुरांद होत्या. मात्र, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यात गाडीचे नुकसान झाले असून कुंकळ्ळी अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन गाडीसह रस्त्यावर पडलेले झाड तोडले. यावेळी वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. या मार्गावरील धोकादायक झाडे तोडण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाचा फटका केळशी मोबोर परिसरालाही बसला. अनेक ठिकाणी माड व इतर झाडे कोसळून पडली. एका कारवर माड पडल्याने नुकसान झाले. याशिवाय रस्त्याशेजारील वीजतारांवर माड व झाडे कोसळून पडल्याने वीजतारा व खांबही तुटले. यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्याला सुरुवात केली. वीज कर्मचार्‍यांनीही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा