सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध

पणजी : सुवेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमुळे पश्चिम बंगालमध्ये आता खऱ्या अर्थाने नव्या युगाचा प्रारंभ होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये नवी पहाट आणि नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन व पाठिंब्यामुळे आता तेथे 'डबल इंजिन सरकार' कार्यरत होईल. यामुळे राज्यभरातील सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासाचा वेग अधिक वाढेल. पश्चिम बंगालमध्ये नवीन संधी, अधिक मजबूत प्रशासन, पायाभूत सुविधांचा विकास, वंचितांचे सक्षमीकरण आणि अंत्योदयाच्या दृष्टिकोनातून प्रगती पाहायला मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी अधिकारी यांना पश्चिम बंगालच्या जनतेच्या सेवेतील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.