राज्यात एप्रिलमध्ये डेंग्यूचा केवळ एक रुग्ण

डॉ. कल्पना महात्मे : राज्यातील डेंग्यू नियंत्रणात


09th May, 11:47 pm
राज्यात एप्रिलमध्ये डेंग्यूचा केवळ एक रुग्ण

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आरोग्य खात्याने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे राज्यातील डेंग्यू नियंत्रणात येत आहे. यंदा एप्रिल महिन्यात डेंग्यूचा केवळ एक रुग्ण आढळला. मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये डेंग्यूचे ६ रुग्ण आढळले होते. खात्यातर्फे घरोघरी जाऊन करण्यात येत असलेली जागृती, डासांच्या उत्पत्तीची स्थळे नष्ट करणे, डेंग्यूच्या हॉटस्पॉट ठिकाणी विशेष काळजी घेणे यामुळे डेंग्यूचे रुग्ण कमी आढळल्याची माहिती राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
राज्यात यंदा जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ११ रुग्ण आढळले. मागील वर्षी याच चार महिन्यांत २९, तर २०२४ मध्ये ९६ रुग्ण आढळले होते. २०२६ मध्ये बहुतेक रुग्ण हे स्थलांतरीत वस्तीमधील होते. या ठिकाणी उघड्यावर पाणी साठवून ठेवल्याने त्यामध्ये डासांची पैदास होऊन डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. अन्य राज्यांतील डेंग्यू हॉटस्पॉट ठिकाणांहून स्थलांतरित कामगार राज्यात येत असल्याने राज्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याशिवाय काही शहरी भागातही रुग्ण आढळले आहेत.
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. घरातील कुंड्या किंवा अन्य ठिकाणी साचलेले अथवा साठवलेले पाणी आठवड्यातून दोन वेळेस साफ करणे गरजेचे आहे. पाणी टंचाई असेल तर पाणी साठवून त्यावर घट्ट झाकण लावल्यास त्यात डासांची पैदास होत नाही. असे पाणी सात दिवसांत वापरले गेले पाहिजे. खात्यातील अधिकारी स्थानिक पंचायतींना सोबत घेऊन डासांच्या पैदासीची ठिकाणे नष्ट करण्याचे काम करत असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.


हेही वाचा