कळंगुट, बागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई, म्हापशात चोरांनी तीन कार्यालयांना बनवले लक्ष्य

पणजी : कळंगुट आणि बागा समुद्रकिनारा परिसरात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या शॅक तसेच इतर अनधिकृत बांधकामांवर पर्यटन खात्याने कारवाई केली. म्हापसा शहरातील मरड येथील कॉसमॉस सेंटर इमारतीमध्ये चोरांनी तीन कार्यालये फोडली. गोव्यात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन व्यक्तींकडून १८ लाख रुपये उकळल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका महिलेला अटक केली. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
खाजोर्डा-बोरी येथे जमिनीच्या वादातून चुलत्याचा कुऱ्हाडीने खून
खाजोर्डा-बोरी येथे जमिनीच्या वादातून दीपक राया नाईक (५८) यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. या खून प्रकरणात त्यांच्या चुलत भावाच्या एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित अद्याप फरार आहे.
नानोडा येथे मिनी बस–थारच्या धडकेत १६ प्रवासी जखमी
डिचोली तालुक्यातील नानोडा येथे खासगी मिनी बस आणि थार वाहनामध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. अस्नोडा येथून इब्रामपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या मिनी बसला समोरून येणाऱ्या थारने जोरदार धडक दिली. धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

ओशालबाग धारगळ येथे दुचाकीस्वाराला वाचवताना कार पलटली
ओशाळबाग, धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले.
सोमवार

दिगंबर कामत, आलेमाव यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंगचा खटला रद्द
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सरकारकडून आवश्यक परवानगी न घेतल्याने लुईस बर्जर प्रकरणातील विद्यमान मंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंगचा खटला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
खाजोर्डा-बोरी येथील खून प्रकरणातील फरार संशयित अटकेत
खाजोर्डा-बोरी येथे जमिनीच्या वादातून दीपक राया नाईक (५८) यांचा कुऱ्हाडीने खून केल्यानंतर फरार झालेला मुख्य संशयित गौरेश कुशन नाईक याला अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे.
विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला ११ वर्षांचा कारावास
पेडणे तालुक्यातील विज्ञान विषयात नापास करण्याची आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पणजी येथील पॉक्सो न्यायालयाने ५४ वर्षीय विज्ञान शिक्षकाला ११ वर्षांच्या सश्रम कारावास आणि ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
कळंगुटमध्ये ‘रोड रेज’वरून हाणामारी
कळंगुट येथे रोड रेजवरून दोन गटांत हाणामारी झाली. या मारामारीमध्ये फिर्यादी गटातील सहाजण जखमी झाले. तर पाच जणांचा संशयित गट फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, करंझाळे तिसवाडीमधील संशयित गटाची ओळख पटवली आहे.
मंगळवार
कळंगुट, बागातील अनधिकृत शॅकवर कारवाई
कळंगुट आणि बागा समुद्रकिनारा परिसरात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या शॅक तसेच इतर अनधिकृत बांधकामांवर पर्यटन खात्याने कारवाई सुरू केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण मोडून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
नवरा मुलगा, आई-वडीलविरोधात हुंडाविरोधी कायद्याखाली गुन्हा
दहा लाख रुपये रोख व पाच तोळे सोने दिल्याशिवाय लग्न होणार नाही, असे ऐनवेळी सांगणारा नवरा मुलगा, त्याचे आईवडिल यांच्या विरोधात वास्को पोलिसांनी हुंडाविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. मुलीच्या वडिलांनी वास्को पोलीस स्थानकात सदर तक्रार दिली आहे.
बुधवार
म्हापशात तीन कार्यालये फोडली
म्हापसा शहरातील मरड येथील कॉसमॉस सेंटर इमारतीमध्ये चोरांनी चोरी केली. चोरांनी इमारतीमधील तीन कार्यालयांचे कुलूप तोडून १५ हजार रुपयांची रोकड आणि मौल्यवान ऐवज लंपास केला आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.

बेतोडा येथे गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
बेतोडा येथे स्कूटरवरून जात असताना दिनेश तुळशीदास गावडे (४८, उडीवाडा- उसगाव) याला गव्याचा धक्का बसून मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांत गव्याच्या हल्ल्यात दोन बळी गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिनेश तुळशीदास गावडे हा फोंडा पोलीस हद्दीत गृहरक्षक म्हणून काम करीत होता.
गुरुवार
सावर्डे-सत्तरी येथे गॅस गळतीमुळे दुकानाला आग
सावर्डे -सत्तरी येथील पुलाजवळ असलेल्या एका दुकानातील सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक लागलेल्या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीत सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे ४० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले.
१६० रुपयांच्या बिलावरून बाप-लेकावर प्राणघातक हल्ला
आंगड, म्हापसा येथील अलंकार थिएटर परिसरातील पापा फास्ट फूड सेंटरमध्ये जेवणाच्या १६० रुपये बिलावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. फास्टफूड मालक आणि कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यात अन्साभाटमधील राजन हळदणकर (६०) व राहुल हळदणकर (२९) हे पितापुत्र गंभीर जखमी झाले.
सांगोल्डा येथे स्वयंअपघातात बारामतीमधील युवक ठार
सांगोल्डा येथे चोगम रस्त्यावर एका रेस्टॉरंटच्या संरक्षक भिंतीला दुचाकीची धडक बसली. या स्वयंअपघातात विकास रमेश सोलट (२४, रा. बारामती पुणे) हा दुचाकीस्वार युवक ठार झाला. युवक पर्वरीतील मॅजेस्टिक कॅसिनोमध्ये नोकरीला होता.
कौटुंबिक वादातून पतीचा पत्नीवर चाकूहल्ला
बांबोळी येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकू हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी आगशी पोलिसांनी संशयित पती नरेश सुवारीस (४७,पाले - शिरदोन) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शुक्रवार

म्हापसा बाजारपेठेतील गणेश बेकरीला आग
म्हापसा येथील बाजारपेठेतील चण्याची खोरणा गल्लीतील ‘गणेश बेकरी’ या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत इलेक्ट्रिक ओव्हन आणि त्यातील बिस्किटे जळून खाक झाल्याने सुमारे ८० हजारांचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
लहान मुलांच्या भांडणानंतर पालकांनी केली मारामारी
सातिंगणवाडी, खोर्ली येथे खेळावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादात पालकांनी उडी घेतल्याने या क्षुल्लक वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. या मारहाणीत एकजण जखमी झाला असून म्हापसा पोलिसांनी इमाम हुसेन ऊर्फ राजा जमीर शिकारपूर आणि यासीन जमीर शिकारपूर या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
कोलवा पोलिसांकडून गांजासह नागालँडच्या युवकाला अटक
कोलवा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत ५६ हजारांच्या गांजासह संशयित डेविड लोथा (३१, रा. वोखा सदर, नागालँड) याला अटक केली. कोलवा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी गांधावली येथील अंतर्गत रस्त्यावर ही कारवाई केली.
शनिवार
नोकरीचे आमिष दाखवून तिघांची १८ लाखांची फसवणूक
गोव्यात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन व्यक्तींकडून १८ लाख रुपये उकळल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी सुहाना सुजय नाईक (३९, रा. आमोणा) या महिलेला अटक केली आहे.
मद्यधुंद पर्यटकांचा बागा समुद्रकिनाऱ्यावर राडा
बागा समुद्रकिनाऱ्यावर मद्यधुंद पर्यटकांनी मोठा राडा केल्याची घटना समोर आली आहे. बागा येथील ‘गुड लक’ शॅकमध्ये वीजपुरवठा खंडित होणे आणि जेवणाच्या बिलावरून बेळगाव (कर्नाटक) येथील पर्यटकांच्या गटाने मोठा वाद घातला. या पर्यटकांनी टेबलवर बिअरची रिकामी बाटली फोडून वेटरच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दयानंद करजागी (२३, रा. बेळगाव) याला प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे.
लक्षवेधी
साकोर्डे येथे जंगलात वाघाचा सांगाडा सापडला होता. वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए), वन खाते आणि पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांची समिती वाघाच्या मृत्यूची चौकशी करणार आहे.
रावणफोंड येथील खुल्या जागेत उभी केलेली एप्रिला स्कूटर अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
साकोर्डे येथील जंगलात वाघाचा सांगाडा सापडल्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे (पीसीसीएफ) मागवला आहे.
सावर्डे येथील आई मनिषा नाईक खून प्रकरणातील संशयित आरोपी मुलगा प्रथमेश नाईक याची उच्च न्यायालयाकडून सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली.