देवडी खून प्रकरणातील जामीन मिळणारा पहिला आरोपी

म्हापसा : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आरोपीचा खूनी हल्ल्यामध्ये थेट सहभाग नसल्याची साक्ष नोंदवल्याने शरणबासू उर्फ चम्पी बुधाप्पा गायकवाड (रा. लक्ष्मीनगर हाऊसिंगबोर्ड, म्हापसा) याची सशर्त जामिनावर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली. गणेशपुरी म्हापसा येथे वैयक्तिक वादातून घडलेल्या अहमद देवडी (३०, सातींगणवाडी खोर्ली) याच्या खून प्रकरणी संशयितांपैकी जामिनावर सुटका झालेला शरणबासू हा पहिलाच आरोपी आहे.
उच्च न्यायालयात बुधवारी आरोपी शरणबासू गायकवाड याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदार संदेश साळकर यांनी, हल्ल्यावेळी अर्जदार आरोपी घटनास्थळी उपस्थित होता; मात्र मारहाणीत त्याचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, अशी साक्ष दिली. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी आपल्या आदेशात ही बाब नमूद केली आहे.
५० हजार रुपये हमी रक्कम व तितक्याच रकमेचे हमीदार तसेच खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्यासाठीच गोव्यात प्रवेश करणे अशा अटींसह आरोपीचा हा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.
दरम्यान, ३० मे २०२४ रोजी पहाटे ३ च्या सुमारास गणेशपुरी म्हापसा येथील गृहनिर्माण वसाहतीमधील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली होती. संशयित आरोपी घटनास्थळी दारू पीत बसले होते. तिथे दुचाकीवरून अहमद देवडी व संदेश सहदेव साळकर (२८, रा. खुटवळ पेडणे) हे तिथे गेले होते. देवडी व मुख्य संशयित आरके यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होता. या रागातून संशयितांनी वरील दोघांना लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर १८ जून २०२४ रोजी देवडी याचा गोमेकॉत उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, संदेश साळकर याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले होते.
याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी प्रथम ३०७ कलमान्वये खुनी हल्लाचा गुन्हा नोंद केला होता. नंतर अहमद देवडी याचा मृत्यू झाल्यानंतर ३०२ कलमान्वये खुनाच्या गुन्ह्यात हे प्रकरण वर्ग केले होते. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मंथन राजू च्यारी (रा. घाटेश्वरनगर खोर्ली), श्रीधर शिवाजी किल्लेदार (रा. समतानगर खोर्ली), अभिषेक रमेश पुजारी (रा. गंगानगर खोर्ली), शरणबासू उर्फ चम्पी बुधाप्पा गायकवाड (रा. लक्ष्मीनगर हाऊसिंगबोर्ड, म्हापसा), नागराज उर्फ नागे दशरथ पुजारी (रा. पेडे म्हापसा व मूळ बेळगाव), नारायण उर्फ बाबू उत्तम भालेकर (रा. लक्ष्मीनगर, हाऊसिंगबोर्ड, म्हापसा), मुटप्पा उर्फ सनी भगाप्पा निकोडे (रा. लक्ष्मीनगर, हाऊसिंग बोर्ड म्हापसा) व बोरेश सतीश पुजारी (रा. शेल्डे-केपे व मूळ गोकाक) यांना अटक केली होती. यातील बोरेश पुजारी याचा ऑगस्ट २०२५ मध्ये कळंगुट येथे मृत्यू झाला होता.
याशिवाय मुख्य संशयित रामकृष्ण भालेकर उर्फ आरके याला घटनेच्या २२ दिवसांनी आंबोली- सावंतवाडी येथून पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये म्हापसा न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. तर सप्टेंबर २०२५ मध्ये मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने वरील आरोपींविरूद्ध भा.दं.सं.च्या ३२६, ५०६(२), ३०७, १२०-ब, २१२, ३०२, २०१ व ३४ कलमांतर्गत आरोप निश्चित केले होते.
मारहाणीत देवडीचा झाला होता मृत्यू
म्हापसा येथील गणेशपुरी परिसरातील गृहनिर्माण वसाहतीजवळील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली होती. काही संशयित आरोपी तेथे दारू पित बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अहमद देवडी आणि संदेश साळकर यांच्यावर वैयक्तिक वादातून हल्ला करण्यात आला. लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान अहमद देवडी यांचा मृत्यू झाला होता.