कॉसमॉस सेंटरमधील तीन कार्यालये फोडली

म्हापसा : म्हापसा शहरातील मरड येथील कॉसमॉस सेंटर इमारतीमध्ये चोरांनी बुधवारी धाडसी चोरी केली. अज्ञात चोरांनी इमारतीमधील तीन कार्यालयांचे कुलूप तोडून १५ हजार रुपयांची रोकड आणि मौल्यवान ऐवज लंपास केला आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.
चोरांनी इमारतीच्या खिडकीचा कडा आणि दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. विकेश हसोटीकर यांची दोन आणि प्रवीण शेट यांचे एक, अशी एकूण तीन कार्यालये फोडण्यात आली. बुधवारी सकाळी मालक कार्यालयात आले असता, सामान विस्कळीत अवस्थेत दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. हसोटीकर यांच्या कार्यालयातील १५ हजार रुपये आणि तिन्ही कार्यालयांतील किमती वस्तू चोरांनी पळवल्या आहेत.
म्हापसा पोलिसांसमोर मोठे आव्हान
गेल्या काही महिन्यांपासून म्हापसा शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी ३ एप्रिल रोजी म्हापसा बाजारपेठेतील सहा दुकाने फोडून १ लाख रुपये लुटले होते. या प्रकरणातील दोघा संशयितांना कणकवली पोलिसांनी अटक केली असली, तरी महाराष्ट्रातील इतर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याने म्हापसा पोलिसांना त्यांचा ताबा मिळवण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता पुन्हा एकदा बाजारपेठेच्या जवळ असलेल्या इमारतीतील कार्यालये लक्ष्य केल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे म्हापसा शहरातील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या टोळ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
म्हापसा शहरात घडलेल्या चोरीच्या घटना
- ३ एप्रिल २०२६ रोजी म्हापसा बाजारपेठेतील ६ दुकाने फोडून चोरांनी १ लाख रुपये लुटले होते. या प्रकरणातील दोघा संशयितांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.
- ७ ऑक्टोबर २०२५ रोजी गणेशपुरी येथील डॉ. महेंद्र कामत घाणेकर यांच्या घरावर दरोडा टाकून ३० लाखांचा ऐवज लुटला होता. गुन्हे शाखेने यातील ६ बांगलादेशी दरोडेखोरांना नुकतीच अटक केली आहे.
- २९ एप्रिल २०२४ रोजी बोडगेश्वर मंदिरात रक्षकाला बांधून ७.१६ लाखांची रोकड लुटली होती. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी संशयितांना अटक करून चोरीची रक्कम हस्तगत केली होती.