गोमंतकीयांसाठी सवलतीच्या दरात अष्टविनायक आणि शिर्डी यात्रांचे आयोजन

पणजी : गोव्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोविड महामारीच्या काळात बंद झालेली हॉलिडे पॅकेजेस आणि विविध पर्यटन टूर तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय गोमंतकीयांसाठी अष्टविनायक, तिरुपती, शिर्डी आणि वालंकिणी यांसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.
यासाठी जीटीडीसीकडून लवकरच दोन नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आमदार केदार नाईक यांनी दिली. 'गोवा बियॉन्ड बीचेस' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा महामंडळाचा मुख्य हेत असून, यातून गोव्यातील अंतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष केदार नाईक यांनी या योजनांची सविस्तर माहिती दिली. या वेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकार, उप-व्यवस्थापकीय संचालक दीपक नार्वेकार आणि थॉमस कूकचे प्रतिनिधी रूपेश पर्वतकार उपस्थित होते. नाईक यांनी स्पष्ट केले की, अनेक गोमंतकीयांची विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असते. त्यांच्या या इच्छेचा आदर करत सवलतीच्या दरात अष्टविनायक, शिर्डी, वालंकिणी आणि तिरुपती या तीर्थक्षेत्रांच्या यात्रांचे आयोजन केले जाणार आहे. या प्रवासाच्या सोयीसाठी महामंडळ स्वतःच्या मालकीच्या दोन नवीन बसेस खरेदी करणार आहे, जेणेकरून प्रवाशांना कोणतीही गैरसोय होणार नाही.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना नाईक यांनी हॉलिडे पॅकेजेसबाबत सविस्तर माहिती दिली. पर्यटकांना गोव्यातील देवळे आणि अंतर्गत भागातील नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडवून आणण्यासाठी ही हॉलिडे पॅकेजेस पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये कॅपिटल रिट्रीट पॅकेज, कूल कोस्टलाईन पॅकेज, सदन गेटवे पॅकेज आणि 'या, या मया या' यांसारख्या विविध पॅकेजेसचा समावेश आहे. कॅपिटल रिट्रीट पॅकेज १८,३३५ रुपयांचे असून ते तीन रात्री आणि चार दिवसांचे असेल. पणजी रेसीडेन्सीवरून सुरू होणाऱ्या या पॅकेजमध्ये सिकेरी, फोर्ट आग्वाद, कळंगुट बीच आणि विविध मंदिरांचे दर्शन घडवले जाणार आहे. तसेच १७,५६० रुपयांचे कूल कोस्टलाईन पॅकेज कळंगुट रेसीडेन्सीवरून सुरू होईल आणि त्यात ब्रेकफास्ट, जेवणाची सोय, बॅसीलीका, मंगेशी, शांतादुर्गा मंदिराचे दर्शन आणि रिवर क्रूझचा समावेश असेल.
दक्षिण गोव्यातील पर्यटकांच्या सोयीसाठी मडगाव आणि वास्को रेसीडेन्सीवरून १४,४५१ रुपयांचे सदन गेटवे पॅकेज सुरू केले जाईल. याशिवाय 'या, या मया या' हे पॅकेज मये रेसीडेन्सीवरून ७,१२४ रुपयांत उपलब्ध होणार आहे. यामध्ये हरवळे येथील धबधबा, विठ्ठल मंदिर, कुडणे येथील जैन मंदिर आणि पांडव गुहा या परिसराचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल. यासोबतच एका दिवसाच्या मये टूराचाही या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. जीटीडीसीच्या या निर्णयामुळे स्थानिक पर्यटकांना व नागरिकांना विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सोय उपलब्ध होणार आहे.