२००९ मध्ये एक तर २०१९ मध्ये चार वाघांचा मृत्यू झाल्याची वनविभागाकडे नोंद.

पणजी : गोव्यात साकोर्डाच्या जंगलात सापडलेल्या वाघाच्या सांगाड्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने मुख्य वनसंरक्षकांकडून (पीसीसीएफ) सविस्तर अहवाल मागवला आहे. या प्रकरणी वनमंत्री विश्वजीत राणे यांनी माहिती देताना सांगितले की, वाघाचे दात तसेच इतर अवयवांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून, त्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल.
प्राथमिक अंदाजानुसार, वाघाचे वय झाल्यामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यतेवर पूर्णपणे अवलंबून न राहता वनविभागाने प्रत्येक बाजूने चौकशी सुरू केली आहे. सांकोडे परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिकारी (कासादोर) फिरत असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे वाघाची शिकार करून त्याची हत्या करण्यात आली असण्याची शक्यताही स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. या सर्व शक्यता लक्षात घेऊन चौकशीचे चक्र फिरणार आहे. मुख्य वनसंरक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या संदर्भात अधिकृतपणे स्पष्टीकरण देणे शक्य होईल, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली.
सांकोडे जंगलामध्ये केवळ सांगाडाच नव्हे, तर पट्टेरी वाघाच्या कातडीचे दोन भागही सापडले आहेत. वनखात्याने या जागेचा पंचनामा केला असून, वाघाचा मृत्यू झाल्याचे यामुळे निश्चित झाले आहे. गोव्यामध्ये एकूण पाच पट्टेरी वाघ अस्तित्िवत होते. त्यामुळे सापडलेला सांगाडा त्यापैकीच एका वाघाचा आहे, की हा दुसराच वाघ आहे, हे फॉरेन्सिक अहवाल आणि पुढील तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
गोव्यात वाघांची संख्या सातत्याने कमी होत असून ती अत्यंत चिंतेची बाब आहे. यापूर्वी २००९ मध्ये एका वाघाचा तर २०१९ मध्ये चार वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. वाघांची संख्या आधीच रोडावत असताना त्यात आणखी एका वाघाचा मृत्यू होणे पर्यावरणाच्या दृष्टीने भूषणावह नाही. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने सखोल आणि तर्कशुद्ध तपास करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या प्रकरणाच्या चौकशीअंती सत्य समोर येईलच, परंतु गोव्यातील वन्यजीव संरक्षणासाठी अशा घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.